सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायण आणि प्रथमेश लघाटे यांचा आज गुरुवारी २१ डिसेंबर रोजी मोठया थाटात लग्नाचा बार उडाला आहे. अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने मुग्धा आणि प्रथमेशचा ह लग्न सोहळा पार पडला. यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि त्यावर पेशवाई पगडी परिधान केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. आज अखेर हे दोघेही विवाहबद्ध झाल्याने सगळ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुग्धा आणि प्रथमेशच्या घरी त्यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. हळदीचा सोहळा या दोघांनी आपापल्या घरी पारंपरिक पद्धतीने साजरा केला होता.
तर काल त्यांचे ग्रहमख पूजन पार पडले. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी अतिशय साधेपणाने साखरपुडा केला होता त्यामुळे त्यांचे लग्नही साधेपणानेच पार पडेल असे म्हटले गेले. मात्र मुग्धा आणि प्रथमेशच्या या लग्नाला कलाकारांची मांदियाळीच जमलेली पाहायला मिळाली. सारेगमप लिटिल चॅमप्सच्या पहिल्या पर्वातील त्यांचे अनेक मित्र मैत्रिणी या लग्नाला उपस्थित होते. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड यांनीही या लग्नात हजेरी लावून मुग्धा आणि प्रथमेशचे अभिनंदन केले. प्रथमेश आणि मुग्धा हे दोघेही सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून एकमेकांना ओळखत होते. मुग्धा या शोमध्ये सगळ्यात लहान असल्याने आणि तिच्या सुंदर आवाजाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तेव्हापासून तिला या शोची मॉनिटर म्हटले जाऊ लागले. तर प्रथमेश गोड गुबगुबीत मुलगा म्हणून त्याला मोदक म्हणण्यात आले. तेव्हापासून हे दोघे स्वतःच्या नावापेक्षा मॉनिटर आणि मोदक म्हणूनच ओळखू लागले होते.
या शो नंतर मुग्धा आणि प्रथमेशने अनेक कार्यक्रमात गाण्यांचे सादरीकरण केले. एकत्र काम करताना प्रेमाची जाणीव झाल्यानंतर मुग्धाने प्रथमेशला दादा म्हणणे सोडून दिले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत याची जाणीव त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील झालेली होती मात्र दोघे कधी आपलं नातं जाहीर करतात याचीच ते वाट पाहून होते. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचे हे नाते कबूल करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता हे दोघेही विवाहबद्ध झाल्यानंतर प्रेक्षक आर्या आंबेकरला तिच्या लग्नाबाबत विचारू लागले आहेत. तेव्हा आर्या देखील लवकरच ही गोड बातमी सांगेल अशी सर्वांना आशा लागून आहे. तूर्तास प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायण यांना लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.