तु मला मराठीत काय बोलला ज्यामुळे अक्षयने माझी खिल्ली उडवली … गैरसमजामुळे झाली होती प्रेमाला सुरुवात
व्ही शांताराम यांचा नातू म्हणून ओळख मिरवण्यापेक्षा अशी ही बनवाबनवीमधला ‘शंतनू’ म्हणून सिद्धार्थ रे ने त्याची ही ओळख मृत्यूपश्चातही जपलेली पाहायला मिळते आहे. सिद्धार्थ रे याने चाणी चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते. अशी ही बनवाबनवी नंतर तो हिंदी चित्रपटातही काम करू लागला. त्याचा पहिलाच हिंदी चित्रपट अभिनेत्री शांतिप्रियासोबत होता. सिध्दार्थला आपल्यातून जाऊन १९ वर्षे झाली आहेत. काल २१ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा २४ वा वाढदिवस झाला . सिद्धार्थ सोबत केवळ चार वर्षे संसार करणाऱ्या शांतिप्रियाने त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी शांतिप्रिया सिध्दार्थच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळते. या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी जुळली ते जाणून घेऊयात. सौगंध हा शांतिप्रियाचा पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर शांतिप्रियाकडे मेरे सजना साथ निभाना, फुल और अंगार असे चित्रपट आले. यामुळे शांतिप्रिया ए ग्रेड चित्रपटाची नायिका म्हणून मिरवू लागली.
ए ग्रेडचेच चित्रपट केल्यामुळे अशाच भूमिका करायच्या हे तिने ठरवलं होतं. जेव्हा चौथ्या चित्रपटासाठी तिला विचारणा झाली त्यात सिद्धार्थ हिरो असणार हे तिला सांगण्यात आले. सिद्धार्थ कोण आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. तेव्हा दिग्दर्शकाला विचारल्यानंतर तो व्ही शांताराम यांचा नातू असल्याचे तिला सांगितले. सिद्धार्थने त्या अगोदर मराठी चित्रपट केले होते. त्याची झलक पाहण्यासाठी तिने त्याचे काही व्हिडीओ पाहिले. तेव्हा हा खूपच हँडसम मुलगा आहे म्हणून शांतिप्रियाने चित्रपटाला होकार दिला होता. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच भेटीत सिध्दार्थला समोर पाहून शांतिप्रिया त्याच्या प्रेमातच पडली. जीन्स त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डोळ्यांवर गॉगल असलेल्या सिध्दार्थला पाहून शांतिप्रियाच्या मनात ती घंटी वाजली. चित्रपट रिलीजही झाला पण शांतिप्रिया सिध्दार्थजवळ काहीच बोलू शकली नाही. दरम्यान चित्रपटाच्या लॉन्च सोहळ्यात अक्षय कुमार, शांतिप्रिया आणि सिद्धार्थ एकाच मंचावर आले तेव्हा सिध्दार्थने शांतिप्रियाला ‘गाढव’ म्हणून संबोधले.
सिद्धार्थने मराठी शब्द वापरला असल्याने तो शांतिप्रियाला मुळीच समजला नव्हता. म्हणून अक्षयने तिची फिरकी घेण्यास सुरुवात केली. सिध्दार्थकडे पाहून अक्षय कुमार शांतिप्रियाची खिल्ली उडवू लागला तेव्हा घरी गेल्यावर शांतिप्रियाने सिध्दार्थला फोनवरून खूप झापले आणि तू मला मराठीतून काय म्हणालास? असे विचारले. तेव्हा सिद्धर्थने मी तुला डाँकी एवढंच म्हणालो यात काहीच नाही तुझा मोठा गैरसमज झाला असे म्हणत त्याने तिची समजूत घातली. पण नंतर चित्रपटात एकत्र काम करत असतानाच सिध्दार्थने शांतिप्रियाला प्रपोज केले आणि तिच्या आईकडे लग्नाची मागणी घातली. तेव्हा शांतिप्रियाचे करिअर नुकतेच चालू झाले होते म्हणून तिच्या मोठया भावाने अजून थोडे दिवस थांबण्याची विनंती केली. पण याचदरम्यान दोघांचेही लग्न अगदी थाटात पार पडले. २१ डिसेंबर १९९९ मध्ये दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने मराठी, दाक्षिणात्य तसेच बंगाली अशा तिन्ही पद्धतीने त्यांनी लग्नाची गाठ बांधली.