
झी मराठीवरील ‘पारू’ या मालिकेच्या कलाकारांवर न्याय मागण्याची वेळ आली आहे. या मालिकेच्या अनेक कलाकारांनी सातारा येथील अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे त्यांची तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, झी मराठीची पारू ही मालिका सातारा येथील परळीमध्ये शूट केली जात आहे. या मालिकेच्या कलाकारांचे कित्येक महिन्यांचे मानधन निर्मात्याने दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कलाकारांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. दरम्यान ही तक्रार दाखल केल्यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांनी मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मिती टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

तसेच या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञ टीमला काम करण्याचा विचार करावा असाही सल्ला महामंडळाकडून देण्यात आला आहे. या मालिकेसंदर्भात आणखी काही तक्रारी असल्यास महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ साताराचे शाखा प्रमुख महेश देशपांडे यांनी याबद्दल म्हटले की, “सातारा भागात चालू असणाऱ्या झी मराठी या चॅनलवरील पारू या सिरीयलचे शूटिंग परळी व सातारा भागात चालू आहे. त्यात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे पैसे बाकी आहे ते अनेक महिन्यांपासून मिळत नाही तसेच तेथील प्रोडक्शन मॅनेजर व इतर प्रोडक्शनच्या लोकांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याच्या अनेक तंत्रज्ञ व महिला कलाकारांच्या लेखी व तोंडी तक्रारी सातारा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ येथे आलेल्या आहेत. यासंदर्भात तेथील दिग्दर्शक निर्मिती व्यवस्थापक यांच्याशी सातारा शाखेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते भेटायला येण्यास टाळाटाळ करत आहेत. तर काही जण फोन ही उचलत नाहीत. याची दखल घेऊन चित्रपट महामंडळाच्या तंत्रज्ञ व कलाकार यांना न्याय मिळण्यासाठी पोलिसांमार्फत व इतर योग्य न्याय व्यवस्थेमार्फत कारवाई करणार आहेच.

तरी आपल्या भागातील अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद कलाकार, ज्युनिअर कलाकार, तंत्रज्ञ यांनी या मालिकेत काम करताना विचार करावा. त्याच प्रमाणे अजून या मालिकेच्या पैसे व इतर तक्रारी संदर्भात त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा शाखेत संपर्क साधावा” पारू ही मालिका फेब्रुवारी २०२४ पासून प्रसारित झाली आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्या यांनी मालिकेच्या कलाकारांचे मानधन थकवले अशी या कलाकारांनी चित्रपट महामंडळाकडे तक्रार नोंदवली आहे. कित्येक महिन्यांपासून आम्हाला पैसे मिळाले नाहीत अशी यांची तक्रार आहे. त्यामुळे पारू मालिकेवर टांगती तलवार आली आहे. दिग्दर्शक आणि निर्मिती टीम यावर काय तोडगा काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.