झी मराठीवरील पारू या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे. गेले काही दिवस रखरखीत चाललेली ही मालिका आता नवीन वादळ घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत दिशाला पोलिसांनी अटक केली होती. किर्लोस्कर कुटुंबात शिरकाव करता यावा म्हणून दिशा प्रीतमसोबत लग्न करायला उत्सुक होती. पण पारूमुळे तिच्या कटकारस्थानाचा उलगडा झाला आणि तिला जेलची हवा खावी लागली. पण जाताना तिने किर्लोस्कर कुटुंबाला बरबाद करणार अशी धमकी दिली होती. त्यामुळे मालिकेत आता कटकारस्थानाला पुन्हा एकदा वाव मिळाला आहे.
जेलमध्ये असलेल्या दिशाची अवस्था पाहून तिच्या मदतीला एकजण आलं आहे. हे पात्र नक्की काय आहे हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. हे नवीन वादळ घेऊन येणारी अभिनेत्री तुमच्या चांगलीच परिचयाची आहे, कारण याअगोदर तिने झी मराठीवर नायिकेची भूमिका साकारलेली होती. अभिनेत्री श्वेता खरात ही भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मन झालं बाजींद या मालिकेत श्वेता खरातने कृष्णाची भूमिका साकारली होती. आता पारू मालिकेत तिची खलनायिका म्हणून एन्ट्री होणार आहे. हे पात्र दिशाची बहीण असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी ती आता किर्लोस्कर कुटुंबाविरोधात नवीन चाल खेळणार असे तर्क लावले जात आहेत.
श्वेता खरात हिने कलर्स मराठीच्या राजा राणीची गं जोडी मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. सहाय्यक भूमिका साकारल्यानंतर झी मराठीने तिला नायिकेची संधी देऊ केली. आता झी मराठीनेच तिला खलनायिका म्हणूनही अभिनयाची संधी दिली आहे. श्वेता खरात आणि अभिनेता नितीश चव्हाण दोघेही उत्तम डान्सर आहेत. नितीशच्या डान्स अकॅडमीमधून या दोघांची मैत्री झाली. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पाहायला मिळतात. तूर्तास या नवीन भूमिकेसाठी श्वेता खरात हिचे अभिनंदन आणि शुभेच्छा!.