महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. केवळ मराठी भाषिकच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षक देखील या शोचे फॅन झालेले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या शोमधील कलाकारांनी एक्झिट घेतल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. ओंकार भोजने, विशाखा सुभेदार यांना परत शोमध्ये बोलवावे अशी मागणी देखील करण्यात आली. अर्थात सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनाही ओंकारने हास्यजत्रेत यावे अशी मनापासून इच्छा आहे. त्यांच्यात कुठलेही वाद नाहीत हे ते वारंवार सगळ्यांना सांगत आहेत. फक्त ओंकार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याला याशोसाठी वेळ देता येत नाही याचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला होता.
पण तरी देखील वारंवार प्रेक्षकांची होत असलेली ही मागणी पाहून अखेर सचिन गोस्वामी यांनी ओंकारला पुन्हा हास्यजत्रेत सहभागी करून घेतलेले आहे. लवकरच ओंकार भोजनेची पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या मंचावर दमदार एन्ट्री होत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी होत असलेल्या भागात ओंकार भोजने पुन्हा त्याच नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मला वाटलं तर मी येतो नाहीतर येतपण नाय…’ असे तो एंट्रीच्या स्किटमध्येच डायलॉगबाजी करत प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. त्याच्या या एंट्रीवर प्रेक्षक मात्र भलतेच खुश झालेले पाहायला मिळाले आहेत. ओंकार भोजने हास्यजत्रेचा कोहिनुर हिरा आहे त्याच्या नसण्याची कमतरता अनेकांना जाणवत होती, त्यामुळे शोचा टीआरपी देखील खाली घसरला होता मात्र आता तो या शोमध्ये पुन्हा परतल्याने हास्यजत्रा नव्याने खुलून आलेली पाहायला मिळणार आहे.
मधल्या काळात समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप यांनी ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पेलली होती. त्यात गौरव मोरे यानेही महापरिनिर्वाण चित्रपटाच्या निमित्ताने शोमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे हास्यजत्त्रेत काही विशेष घडत नसल्याचे प्रेक्षकांना जाणवले. त्याचमुळे आता ओंकारला बोलावण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही असेच चित्र समोर उभे होते. प्रेक्षकांच्या मागणीचा विचार करूनच ओंकार पुन्हा एकदा हास्यजत्रेचा सदस्य बनणार आहे. शोचा नवीन प्रोमो पाहून ओंकार हास्यजत्रामध्ये परतला याचा आनंद प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे.