अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या वनवास चित्रपटानिमित्त अनेक माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशातच नाटकाच्या प्रसंगी घडलेला एक आठवणीतला किस्सा त्यांनी शेअर केलेला पाहायला मिळाला. नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकापासून केली होती. एका नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग भरला असताना मुख्य नटीचा नवरा वारला म्हणून ती आली नव्हती. याबद्दल नाना पाटेकर म्हणतात की, “आमच्या नाटकात काम करणारी जी मुख्य नटी होती तिचा नवरा वारल्याचे आम्हाला कळलं. सकाळीच हा मेसेज मिळाल्याने ती येणार नाही हे आम्हाला कळले होते. पण आम्ही मेकअप करून तयार होतो. कारण हाऊसफुल शो लागणार होता.
त्या नाटकाला स्मिता सगळं शूटिंग वगैरे करून आली होती. पडदा उघडला. तेव्हा मी समोर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना म्हटलं की, गोंधळ असा झालेला आहे की आमची मुख्य नटी आहे तिचं या नाटकात मोठं काम आहे. माझे तिच्याबरोबर काही सीन्स आहेत. तिचा नवरा वारल्यामुळे ती आज येणार नाहीये. त्यामुळे आजचा प्रयोग करता येणार नाही. माफ करा असं आम्ही म्हणालो.” पुढे नाना पाटेकर असेही सांगतात की, “पडदा बंद होणार होता तेवढ्यात मी म्हटलं एक मिनीट थांबा पडदा उघडा. मग पुन्हा पडदा उघडला गेला.
मी प्रेक्षकांना म्हटलं की हा प्रयोग होऊ शकतो, ती स्टेजवर आहे असं मी मानेन आणि तसे सीन करेन. तिचे डायलॉग कोणीतरी आतून माईकवरून बोलेल. आता कोण बोलेल? ते मला आता या क्षणाला माहीत नाही. तसा प्रयोग करता येईल. सगळे प्रेक्षक एका स्वरात म्हणाले, हो चालेल. प्रयोग झाल्यानंतर स्मिता आतमध्ये येऊन रडत होती. नाना, तू किती भाग्यवान आहेस. मी तिला म्हटलं की, मलाही माहीत नाही काही. फार काय होणार आपल्यावर प्रेम करणारी माणसं समोर बसलेली असतात. झाली फजिती तर झाली. काय हरकत आहे? सतत डोक्यावर घ्यायला पाहिजे, असं कशाला हवं?”