झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेत काही निर्णायक घडामोडी घडताना दिसत आहेत. खरं तर ही मालिका संपू नये अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. कारण सिम्बा आल्या पासून मालिका रंजक वळण घेऊन आली होती. पण आता हाच सिम्बा कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तोंड देताना दिसत आहे. आपण या आजारातून वाचू की नाही याची शाश्वती नसतानाही हा सिम्बा मात्र सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत आहे. त्यामुळे मालिकेचे हे शेवटचे भाग प्रेक्षकांसाठी कठीण जात आहेत.
अर्थात सगळं आलबेल होण्यासाठी मालिकेत एक रंजक ट्विस्ट आणण्यात आला आहे. आपल्या आईबाबांचं लग्न आपण पाहिलं नाही, पण शेवटची इच्छा म्हणून सिम्बाला त्याच्या आई बाबांचं पुन्हा लग्न लागलेलं पाहायचं आहे. सिम्बाची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहे. येत्या काही दिवसात मालिकेत अर्जुन आणि अप्पीच्या लग्नाची तयारी पाहायला मिळणार आहे. अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत ते सुखाने राहावेत अशी सिम्बाची इच्छा आहे. त्याचमुळे त्याने ही इच्छा व्यक्त करताच बेशुद्ध पडलेला तो पाहायला मिळतो.
किमान त्याच्या इच्छेखातर तरी अप्पी आणि अर्जुनने पुन्हा एकदा लग्न करावे असे घरच्यांनाही वाटत आहे. या लग्नानंतर मालिकेचे काही क्षण सगळ्यांसाठीच भावनिक ठरणार आहेत. मालिकेचा शेवट गोड व्हावा, सिम्बा कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडावा अशी एक माफक अपेक्षा आहे. त्यामुळे मालिकेचे हे पुढील भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत.