मराठी सृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज दुःखद निधन झाले आहे. रंगमंचावर काम करत असतानाच त्यांनी स्टेजवरच अखेरचा श्वास घेतल्याचे समजते. सतीश जोशी यांनी आजवर अनेक नाटक, मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे. अभिनेते दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. सृजन द क्रिएशन या त्यांच्या संस्थेचा चौथा वर्धापन दिन म्हणून काही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातच सतीश जोशी हेही महत्वपूर्ण भूमिकेत होते. निधनापूर्वी सतीश जोशी यांनी अभिनय देखील केला होता. पण कार्यक्रम सुरू असताना अचानक ते स्टेजवर खाली कोसळले आणि यातच त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले जाते.
सतीश जोशी यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजेश देशपांडे यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करताच अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. तर अभिनेते अतुल काळे यांनीही सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जोशी गुरुजी गेले, मी त्यांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखतो, मला व माझ्या कुटुंबाला त्यांनी खूप मोठा आधार दिला होता अशा शब्दांत भावुक होऊन त्यांनी सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये सतीश जोशी यांना भूमिका ठरलेल्या असायच्या. साहित्य संघाच्या मच्छकटिका नाटकातून काम केले होते. त्यामुळे सर्वच कलाकारांना त्यांच्या निधनाची बातमी कळताच खूप मोठा धक्का बसला आहे. सतीश जोशी यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.