झपाटलेला ३ चित्रपटात महेश लक्ष्या पुन्हा दिसणार एकत्र….लक्षाबद्दल महेश कोठारे यांचा मोठा खुलासा
महेश कोठारे यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेला प्रमुख भूमिका देऊ केली त्यानंतर ही जोडगोळी मोठा पडदा गाजवू लागली. महेश आणि लक्ष्याच्या अफलातून जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजला. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांनी त्यांना खूप मिस केले. झपाटलेला २ हा चित्रपट लक्ष्याशीवाय बनवण्यात आला पण तो नाही म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. पण आता झपाटलेला या चित्रपटाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच महेश कोठरे यांनी त्यांच्या ‘झपाटलेला ३’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च केले. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
चित्रपटाचे नाव जाहीर होताच प्रेक्षकांनी उत्साहात त्याचे स्वागत केले पण अनेकजणांनी लक्ष्याला मिस करणार असेही म्हटले. पण आता स्वतः महेश कोठारे यांना या चित्रपटात त्यांचा लक्ष्या हवा आहे. झपाटलेला ३ चित्रपटात लक्ष्या असणार आणि महेश लक्ष्या तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असे आश्वासन महेश कोठरे यांनी दिलं आहे. आणि लक्ष्याच्या हयातीत नसतानाही हे शक्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. याबद्दल महेश कोठारे सांगतात की, “लक्ष्या माझा जिवलग मित्र होता आणि तो अजूनही आहे. आणि मला तो मार्गदर्शन करत राहतो असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डेसोबत मला पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. AI च्या माध्यमातून मला लक्ष्मीकांतला पुन्हा रिक्रिएट करायचं आहे आणि ते मी करणारच. त्याला मला पुन्हा एकदा स्क्रीनवर आणायचं आहे. महेश आणि लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार”. असं म्हणत महेश कोठारे आता आणखी एक प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीत करणार आहे. AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनी देखील या निर्णयाचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे.
झपाटलेला हा चित्रपट मराठी सृष्टीतील एक यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटानंतर महेश कोठारे यांनी आदिनाथला घेऊन त्याचा सिकवल काढला. पण कथानकात दम नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला. अर्थात तात्या विंचूचा थरार या चित्रपटात देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटात नसल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटले. याचाच सारासार विचार करूनच महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आता सहज शक्य होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.