
कलर्स मराठीवरील बिग बॉसचा ५ वा सिजन चांगलाच चर्चेत आला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित केल्याने शोने प्रेक्षकांना अचंभीत करून टाकलं आहे. त्यामुळे यंदाचा सिजन तुफान गाजणार अशीच चिन्ह दुसून येत आहेत. रितेश देशमुख त्याची भूमिका उत्तम निभावू शकेल असा विश्वास आहे..तर दुसरीकडे बिग बॉसचे घर डोळ्यांना दिपून टाकणारे ठरले आहे. यावेळी बिग बॉसच्या घरासाठी अवाढव्य खर्च करण्यात आला हे तेथील परिस्थितीवरूनच जाणवते. शोमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आहेत ते सोळा स्पर्धक सोशल मिडियावरही लोकप्रिय आहेत. यंदाच्या सिजनमध्ये सोशल मीडिया स्टार्सना प्राधान्य दिलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे शोच्या टीआरपीमध्ये निश्चितच वाढ होणार हे स्पष्ट आहे.

दरम्यान या शोमध्ये अभिनय, संगीत, सोशल मीडिया स्टार, राजकीय तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रण दिलं आहे. प्रेक्षकांनी या सगळ्यांचं स्वागतच केलेलं पाहायला मिळालं. पण कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांच्या एंट्रीने प्रेक्षकांनी पुन्हा एकदा नाकं मुरडली आहेत. कीर्तनकार हे समाजात प्रबोधनाचे काम करतात, त्यांच्याविषयी समाजात एक आदराची भावना असते. पण बिग बॉसच्या घरात कीर्तनकार आल्याने याअगोदरही ट्रोल केले गेले. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी एन्ट्री केली होती तेव्हाच प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण लोकांच्या या भावना पाहून शिवलीला पाटील यांनी आजारपणाचे कारण सांगत शोमधून काहीच दिवसांत एक्झिट घेतली होती. बिग बॉसचा शो हा केवळ प्रसिद्धी मिळावी यासाठी आहे.

त्यामुळे इथे वाद करणं, एकमेकांच्या कुरघोड्या काढणं असे विषय या शोमध्ये हाताळले जातात. किर्तनकारांनी या शो पासून लांब राहिलेलंच बरं म्हणून प्रेक्षक त्यांना या शोमध्ये पाहण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत अशीच चिन्ह दिसू लागली आहेत. कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनीही अध्यात्मिक मार्गाने लोकांच्या मनात एक जागा बनवली आहे. पण या शोमध्ये सहभागी होऊन त्यांनी चूक केली असेच आता प्रेक्षकांचे म्हणणे आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा हा मार्ग योग्य नाही असेही निदर्शनास आणून दिले जात आहे. त्यामुळे शिवलीला पाटील यांच्यासारखे त्यांनाही लवकरच बिग बॉसचे घर सोडायची वेळ येण्याची शक्यता वाटत आहे.