आज कलर्स मराठी वाहिनीवर मराठी बिग बॉसचा ५ व्या सिजनचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. रितेश देशमुखने शोची धुरा सांभाळत एक एक सहभागी सदस्याची प्रेक्षकांना ओळख करून दिली. यामध्ये पहिल्याच स्पर्धक ठरल्या त्यास अभिनेत्री वर्षा उसगावकर . सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका त्यांनी याच शोमुळे सोडली हे आता स्पष्ट झालं. दरम्यान घरात प्रवेश करणाऱ्या सर्व स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत नक्कीच होणार आहे कारण या शोमध्ये बरेचसे जाणते सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. सगळे एका सरस एक तगडे स्पर्धक यामुळे बिग बॉसचा ५ वा सिजन नक्कीच गाजणार हे आता स्पष्ट झाले आहे. वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, निखिल दामले, पॅडी कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, नीक्की तांबोळी, छोटा पुढारी घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, अभिजित सावंत, महाराज पुरुषोत्तम पाटील, धनंजय पोवार, फुलवा खामकर, आर्या जाधव हे मोठ मोठे सेलिब्रिटी शोमध्ये दाखल झाले आहेत.
याशिवाय बिग बॉसच्या घराची झलक पाहून त्याचा झगमगाट डोळ्यांना दिपवणारा आहे.शो हिट होण्यासाठी वाहिनीने अवाढव्य खर्च केला आहे. पण एकीकडे ही भव्यदिव्यता , मोठमोठे सेलिब्रिटी असताना प्रेक्षक मात्र या शोमध्ये काहीतरी मिस करत आहेत. हे काहीतरी म्हणजेच बिग बॉसचा दरारा. हा दरारा कुठेतरी गायब झालाय असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. रितेश देशमुख हा उत्तम अभिनेता आहे पण महेश मांजरेकर यांच्या सारखा करारेपणा त्याच्या बोलण्यात कुठेतरी कमी पडतो आहे. महेश मांजरेकर यांच्या नावातच एक दरारा होता सगळ्या सदस्यांना त्यांच्या आवाजाने शांत करण्याची ताकद होती. पण रितेश मध्ये हे सामर्थ्य कुठेतरी कमी पडते की काय अशीच चिन्ह दिसत आहेत.
याअगोदर रितेशने बॉलिवूडमध्ये अवॉर्ड सोहळ्यासाठी सूत्रसंचालन केले होते. तेव्हा त्याच्यातला हजरजबाबीपणा प्रेक्षकांनी पाहिला होता. त्यामुळे सध्या प्रेक्षक त्याच्या सूत्रसंचालनावर नाराज असले तरी तो त्यात नक्कीच सुधारणा घडवून आणेल. दरम्यान बिग बॉसचा हा एक ग्रँड प्रीमियर सोहळा असल्याने रितेश कुठेतरी नरम वाटला आहे. पण जिथे त्याला आवाज वाढवायचा असेल तिथे तो नक्कीच आवाज वाढवेल असे मत त्याच्या चाहत्यांकडून देण्यात येत आहे. त्याच्यातला हा बदल विकेंडच्या वॉरमध्ये बघायला मिळो एवढीच एक प्रेक्षकांची माफक अपेक्षा आहे.