काही दिवसांपूर्वी अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने या दोघांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेतून एकत्रित काम करत असताना दोघांमध्ये प्रेम जुळून आले होते. कन्यादान मालिकेतील ही रील लाईफ जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबद्ध झाल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या लग्नाला कन्यादान मालिकेची टीम हजर राहिली होती. तर प्रवीण तरडे, हर्षदा खानविलकर, रमेश परदेशी यांनाही लग्नसोहळ्यात पाहता आले. शुभंकर आणि अमृता या दोघांनी लग्न केले त्यानंतर काही दिवसातच कन्यादान मालिकेच्या अभिनेत्याची लगीनघाई सुरू झाली.
काल गुरुवारी २ मे रोजी अभिनेता चेतन गुरव याने पायल हरमळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. पायल आणि चेतन यांचा हा प्रेमविवाह आहे..काही दिवसांपूर्वीच चेतनने पायलसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत ‘ घरवाले मान गये’ अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. आमच्या लग्नाला घरच्यांनी परवानगी दिली असे चेतनने जाहीर करताच पायल सोबत त्याने साखरपुडा केला होता. त्यानंतर काहीच दिवसात या दोघांनी मोठ्या थाटात लग्नही केले आहे. काल पार पडलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याला संग्राम साळवी, रोहित माने, स्नेहल शिदम, वनिता खरात, उमा सरदेशमुख, प्राची मोरे, प्रज्ञा चावंडे या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
सन मराठीवरील कन्यादान मालिकेतून आकाशच्या भूमिकेने चेतनला लोकप्रियता मिळवुन दिली आहे. कॉलेजमध्ये असतानाच चेतनने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. माधुरी मिडल क्लास या स्टार प्रवाहच्या मालिकेतून त्याने एक मजेशीर भूमिका साकारली होती. वैजू नं १ आणि त्यानंतर तो आता सन मराठीच्या कन्यादान मालिकेतून झळकला. आकाश आणि अमृताच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं आहे. त्याचमुळे ही मालिका दोन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चेतनने ही भूमिका सुंदर वठवलेली पाहायला मिळाली होती. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी पायल आणि चेतन गुरव यांना मनापासून शुभेच्छा.