या कारणामुळे जय दुधानेची येड लागलं प्रेमाचं मालिकेतून एक्झिट…मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री
गेल्या काही दिवसातमालिका सृष्टीत अनपेक्षित बदल घडून येताना दिसत आहेत. काहीच दिवसांपासून अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून काढता पाय घेतला. मालिकेत त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव नसल्याने शालिनी माईंचा खूण करते या अशयावर त्यांच्या पात्राची एक्झिट करण्यात आली. या एक्झिट नंतर वर्षा उसगावकर बिग बॉसमध्ये दिसणार असे बोलले जाऊ लागले, पण या अफवा असल्याचे त्यांनीच मुलाखतीत जाहीर केले. दरम्यान वर्षा उसगावकर पाठोपाठ स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रमुख पात्राची एक्झिट करण्यात आली आहे. मराठी बिग बॉस फेम जय दुधाने याने येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. मे महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेत तो विरोधी भूमिकेत पाहायला मिळाला होता.
.पण जय दुधाने याने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यातच जय दुधानेने ही मालिका सोडलेली पाहायला मिळत आहे. त्याची ही जागा भरून काढण्यासाठी मालिकेत संग्राम साळवीची एन्ट्री करण्यात आली आहे. तब्बल ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संग्राम साळवी पुन्हा एकदा मालिका सृष्टीत सक्रिय झाला आहे त्यामुळे तो सध्या ही भूमिका साकारण्यासाठी उत्साहित असलेला पाहायला मिळतो आहे. पण याच जोडीला जय दुधाने याने मालिकेतून काढता पाय का घेतला असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत.
या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने नुकत्याच एका पोस्टमधून दिली आहेत. जय दुधाने मालिका सोडण्यामागचे कारण सांगताना म्हणतो की, ” गेल्या महिन्यात माझ्या वडिलांचं निधन झालं, यातून मी आणि माझ्या कुटुंबाने खूप मोठं काहीतरी गमावलं आहे. माझ्यावर खुप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे इथून पुढे मी स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका करू शकत नाही. पण या मालिकेत काम करत असताना चॅनलकडून तसेच मालिकेच्या संपूर्ण टीमकडून मला एक खुप चांगला अनुभव मिळाला. पण असे असले तरी तुमचे मालिकेवरचे प्रेम कायम असेच राहुद्या”. असे म्हणत जय दुधानेने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.