कलर्स मराठी वाहिनीवर ‘इंद्रायणी’ ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. वाहिनीचे हेड म्हणून केदार शिंदे यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर आता कलर्स मराठीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका येऊ लागल्या आहेत. तर सिंधुताई माझी माई या मालिकेला नुकताच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला आहे. त्याच जोडीला आता स्पृहा जोशी ‘सुख कळले’ या मालिकेतून कलर्स मराठीवर झळकणार आहे. त्यामुळे केदार शिंदे यांनी वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. इंद्रायणी या मालिकेत चिमुरड्या इंद्रायणीचा धीटपणा पाहून अनेकांनी या मालिकेचे स्वागतच केले आहे. पण मालिकेत इंद्रायणीचा होत असलेला छळ पाहून प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.
इंद्रायणी ही तिच्या आत्याकडे राहते. तिला आईवडील नाहीत. आई वडिलांच्या पश्चात तिचा सांभाळ आता तिची आत्या करत आहे. इंद्रायणीची आत्या तिला सतत टोमणे मारताना दाखवली आहे. एवढंच नाही तर ती इंद्रायणीला शिळी भाकर खायला देत असते. भाकरी शिळी असल्याने त्याबरोबर भाजी तरी दे कोरडी कशी खाऊ? असे म्हणणाऱ्या इंद्रायणीची प्रेक्षकांना मात्र दया येऊ लागली आहे. मालिकेत लहान मुलांच्या बाबतीत असे काही वाईट दाखवणे चुकीचे आहे. मुलांना नातेसंबंधाबाबत आपुलकी वाटायला हवी असे काहीतरी दाखवायला हवे. इंद्रायणीचा असा छळ करणे चुकीचे आहे. ती एवढी हुशार आणि चाणाक्ष मुलगी दाखवलीआहे, तिचं बालपण देखील तेवढंच आनंदी असायला हवं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. नात्यात कटुता दाखवण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवायला हव्या जेणेकरून आताची मुलं इंद्रायणी कडून काहीतरी शिकू शकतील.
अर्थात मालिकेत केवळ आत्याच इंद्रायणीचा छळ करत नाही तर आनंदीबाई सुद्धा तिच्या मागे हात धुवून लागलेली आहे. मालिकेच्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. इंद्रायणीच्या भूमिकेतील सांची भोयार ही चिमुरडी प्रोमोमध्येच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. तर अनिता दाते, संदीप पाठक, स्वानंद बर्वे, गार्गी फुले यांच्या भूमिका तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पण इंद्रायणीचा छळ दाखवणे थांबवायला हवे, तिची हुशारी आणि चाणाक्षपणा इतर मुलांसाठी अनुकरणीय आहे तो त्यांनी घ्यायला हवा असे मत या मालिकेच्या बाबतीत व्यक्त केलं जात आहे.