त्यात माझ्या एका मालिकेच्या शीर्षक गीताचा बळी गेला….प्रेक्षक आपली मालिका सोडून इतर कुठे ही जाऊ नये
गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या शीर्षक गीतांवर मतं मांडण्यास सुरुवात झाली आहे. मालिकेचे शीर्षक गीत हे त्याचा श्वास मानले जाते. पण आताच्या घडीला याच शीर्षक गीतांना डावलण्यात आले आहे. सुरुवातीचे काही भाग वगळता या शीर्षक गीतांना डच्चू दिला जातो. पण एक काळ असा होता जेव्हा याच शीर्षक गीतांसाठी मालिका ओळखल्या जायच्या. गायिका सावनी रविंद्र आणि गायिका प्रियांका बर्वे यांनी बऱ्याचशा मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत पण आता हे शीर्षक गीत दाखवलं जात नाही तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं असं मत या दोघीनीही व्यक्त केलं आहे. त्यांचा हाच मुद्दा पुढे धरून अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही तिच्या एका मालिकेच्या शीर्षक गीताची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘माझ्या एका मालिकेच्या शिर्षक गीताचा बळी गेला’ असे म्हणत तिने या शीर्षक गीतांची व्यथा मांडली आहे. एक झोका नियतीचा या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. याच मालिकेचे शीर्षक गीत शेअर करताना ती म्हणते की, जेव्हा मालिकांना शीर्षकगीतं असायची, ती वेगळी चित्रीत केली जायची आणि मालिकेच्या सुरवातीला ४०-६० सेकंदासाठी दाखवली ही जायची! आपण प्रेक्षक आवडीने ते पाहयचो, ऐकायचो. अशा किती मालिका आहेत ज्याची शीर्षकगीतं आज ही २०-२२ वर्ष झाली तरी आठवतात, आवडतात! आता इतक्या वाहिन्यांवरील मालिकांच्या चढाओढीमुळे सरळ episode सुरू करतात. एक एक सेकंदही महत्त्वाचा असतो. त्यात त्यांचा ही दोष नाही, प्रेक्षक आपली मालिका सोडून इतर कुठे ही जाऊ नये म्हणजे इतर कुठल्याही वाहिनीकडे वळू नये म्हणून जे शक्य आहे ते करतात.
त्यात या शीर्षकगीतांचा बळी गेला. असो. मी मराठी वाहिनीच्या ‘एक झोका नियतीचा’ मालिकेचं हे शीर्षकगीत. बाकी माहीती या video त आहेच. वर्ष २००९! फक्त मराठी च्या YouTube channel वर ही मालिका पाहण्यासाठी उपलब्ध आहे! पण तुम्हांला खरंच वाटतं का की पुन्हा अशी शीर्षकगीतं मालिकेच्या सुरवातीला दाखवायला हवीत आणि तुमचं आवडतं शीर्षकगीत कोणतं?