दादा साळवी यांचा पणतु आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता…. मराठी सृष्टीतील पहिला प्रेमविवाह त्यांनीच केला होता

मराठी सृष्टीला अनेक दिग्गज अभिनेते लाभले त्यातील एक म्हणजे दिवंगत अभिनेते दादा साळवी. गावच्या पाटलाची भूमिका साकारावी ती दादा साळवी यांनीच असं त्यांच्याबाबतीत बोललं जातं. भारदस्त शरीर, झुपकेदार मिश्या यामुळे त्यांची भूमिका चपखल वाटायची. खरं तर मूक पटापासून सुरू झालेल्या अभिनयाच्या कारकिर्दीत प्रमुख भूमिका ते नायिकेचे वडील, चरित्र अभिनेते अशा बहुढंगी भूमिकेतून दादा साळवी यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. आज दादा साळवी हयातीत नाहीत पण ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या काळात त्यांच्या अभिनयाचा दरारा खूप मोठा होता. दादा साळवी हे रत्नागिरीतील फणसोप या गावचे. ४ डिसेंबर १९०४ साली त्यांचा जन्म झाला. पुढे गावच्या जत्रा यात्रा मधून ते नाटकातून काम करत असत.

१९२८ सालच्या खून ए नाहक या मुकपटात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. मदन मंजिरी, भोला शिकार, रात की बात, खुदा की शान अशा बऱ्याच मुकपटानंतर त्यांनी आलम आरा, भक्त प्रल्हाद, प्रेमवीर, महाराणा प्रताप, एक गाव बारा भानगडी, सांगत्ये ऐका, शिकलेली बायको, माणसाला पंख असतात अशा बोलपटातून काम केले. मराठी सृष्टीतील पहिला प्रेमविवाह त्यांच्याच नावावर आहे हे विशेष. सखुबाई या त्यांच्या सह नायिकेसोबत त्यांनी त्याकाळात प्रेमविवाह केला होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की दादा साळवी यांच्या पुढच्या पिढीनेही त्यांच्या अभिनयाचा वारसा जपलेला आहे. मराठी सृष्टीत त्यांनीही स्वतःची अशी एक वेगळी ओळख बनवली आहे हे विशेष. चला तर मग हा अभिनेता नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात.

अभिनेते सुनील तावडे हे दादा साळवी यांचे पणतु आहेत. सुनील तावडे यांच्या आई ह्या मूळच्या रत्नागिरीतील फणसोप गावच्या. माहेरच्या त्या साळवी. त्यांचे आजोबा दिनकर शिवराम साळवी म्हणजेच अभिनेते दादा साळवी होय. सुनील तावडे यांनी पणजोबा दादा साळवी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे जपला आहे. स्वतःच्या अभिनयाच्या बळावर त्यांनी या मराठी सृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुलगा शुभंकर तावडे यानेही खापर पणजोबा दादा साळवी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवलेला पाहायला मिळतो.