जुनिअर मेहमूद यांची आजाराशी झुंज ठरली अखेर अयशस्वी…आपल्या अभिनयाने सर्वाना हसवणारा तारा आज हरपला
बॉलिवूड सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांचे आज प्रदीर्घ आजाराने ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. रात्री २.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर मेहमूद हे पोटाच्या कॅन्सरने त्रस्त होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर जाऊन पोहोचल्याने डॉक्टरांनी केवळ ४० दिवस जगू शकतील असे भाकीत केले होते .मात्र आज अखेर मृत्यूशी त्यांची ही एकाकी झुंज अयशस्वी ठरलेली पाहायला मिळाली. ज्युनिअर मेहमूद यांना कॅन्सरच्या आजाराचे खूप उशिरा निदान झाले होते. पोटात सतत दुखत होते तरीही त्यांनी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले होते. पण त्यानंतर मात्र त्यांच्या वजनात घट होऊ लागली तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला असल्याचे सांगण्यात आले. अर्थात यामुळे मेहमूद यांचे मानसिक खच्चीकरण होत गेले.
पण बॉलिवूड इंडस्ट्रीतील मित्रांची भेट घेण्याची त्यानी शेवटची ईच्छा व्यक्त केली होती. तेव्हा जॉनी लिव्हर, जितेंद्र, सचिन पिळगावकर यांना ही बातमी समजताच त्यांनी स्वतः मेहमूद यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. शिवाय सचिन पिळगावकर यांनी आपल्या मित्राच्या उपचारासाठी काही आर्थिक मदत देखील देउ केली होती, पण मेहमूद यांच्या मुलांनी त्यांची मदत नाकारली होती आणि मेहमूद यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा अशी त्यांनी विनंती केली होती. तर जितेंद्र यांनी देखील मेहमूद यांची प्रत्यक्षात जाऊन भेट घेतली. आपल्या मित्राची ही अवस्था पाहून जितेंद्र यांना अश्रू लपवता आले नव्हते. हे जग सोडून जाण्याअगोदर ज्युनिअर मेहमूद यांनी म्हटले होते की , या जगाने मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखले जावे, ‘तुम्हाला चार लोकं जर चांगलं म्हणत असतील तर तुमचे आयुष्य हे सार्थकी झाले असे म्हटले जाते’. असे त्यांनी म्हटले होते.
ज्युनिअर मेहमूद यांचे खरे नाव नईम सय्यद असे होते. बालवयातच त्यांनी बॉलिवूड सृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या बोलण्याच्या हटके स्टाईलमूळे ते विनोदी कलाकार हणून प्रसिद्धीस आले होते. बॉम्बे टू गोवा, अदला बदली, गुरू चेला, ब्रह्मचारी, ठोकर, छोटी बहु, घर घर की कहाणी अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. कॉमेडियन मेहमूद यांच्या नावावरूनच त्यांना ज्युनिअर मेहमूद हे नाव पडले होते. मेहमूद यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ततानी हम काले है तो क्या हुवा या गाण्यावर नृत्य सादर केले होते. तेव्हा त्याचा हा डान्स पाहून मेहमूद खूप खुश झाले. मेहमूद यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या नईमला पुढे ज्युनिअर मेहमूद म्हणूनच ओळख मिळू लागली.