अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असते त्यामुळे या क्षेत्राच्या जोडीला आपला स्वतःचा व्यवसाय असावा यासाठी अनेक कलाकार धडपडत असतात. अभिनय क्षेत्रात जम बसेलच असे नसते याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. म्हणूनच कलाकार या पर्यायाची निवड करतात. रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल हिनेही हॉटेल व्यवसायात उतरण्याचे धाडस केले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत अनघाने श्वेताची भूमिका गाजवली होती. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली अर्थात तिची ही विरोधी भूमिका असली तरी तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. या मालिकेनंतर पुढे काय असे तिला विचारण्यात येऊ लागले. त्यामुळे अनघाने आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हॉटेल व्यवसायात पाऊल टाकण्याचे धाडस केले आहे.
पुण्यातील डेक्कन भागात अनघाने “वदनी कवळ” अशी परिपूर्ण थाळी असणारे हॉटेल सुरू केले आहे. अर्थात ही प्रोसेस अजून चालू असल्याचे तिने एका व्हिडिओत सांगितले आहे. अनघाच्या मदतीला तिचा भाऊ अखिलेश देखील पुढे सरसावला आहे. अनघा अतुल ही प्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजींची मुलगी आहे. झी मराठीच्या ‘वेध भविष्याचा’ आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमासाठी त्यांनी योगदान दिले होते. अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे व्हिजनसाठी ब्रँड मॅनेजरचे काम केले होते यानंतर ती अनन्या नाटकात आणि क्यूँ रिशतों में कट्टी बट्टी अशा हिंदी मालिकेतून झळकली पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती रंग माझा वेगळा या मालिकेने. आपल्या हॉटेल व्यवसायाच्या पदार्पणाबद्दल ती म्हणते की, ” वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतय तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. ।।गणपती बाप्पा मोरया।। “. अनघाच्या या हॉटेल व्यवसायाला मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन काहीतरी करतीये हे पाहून अनेकांनी तिचं मोठं कौतुकही केलं आहे.