बहुचर्चित एनिमल हा बॉलिवूड चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. सुरुवातीला या चित्रपटाला पसंती मिळणार नाही असे बोलले जात होते मात्र चित्रपटातील अश्लील डायलॉग आणि इंटिमेंट सिन प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी झाले. चित्रपटात कुठेही लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर तो फोल ठरेल पण तुम्हाला केवळ मनोरंजन म्हणून पहायचे असेल तर तुमचे पैसे वसूल होतील असा हा चित्रपट आहे. रणबीर कपूर, रश्मीका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डीमरी या कलाकारांसह उपेंद्र लिमये, मृण्मयी गोडबोले यांच्याही यात महत्वपूर्ण भूमिका आहेत. उपेंद्र लिमये, तृप्ती डीमरी आणि रणबीर कपूर यांनी या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तृप्ती डीमरी आता नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाऊ लागली आहे.
अश्लील डायलॉगमुळे आणि इंटिमेंट सिनमुळे हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे. उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटात १५ मिनिटांसाठी काम केले आहे. पण त्यांच्या फ्रेडीच्या भूमिकेमुळे ते चांगलेच प्रसिद्धीस आले आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमये आहे हे अगोदर कोणालाच माहीत नव्हते. पण जेव्हा त्यांची एन्ट्री होते तेव्हा पूर्ण थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज घुमतो. अश्लील डायलॉगमुळे उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटाला नकार दिला होता. पण ह्या भूमिकेसाठी तुम्हीच योग्य आहेत असे म्हटल्यानंतर त्यांनी या चित्रपटाला होकार कळवला. अर्थात रणबीर कपूर सारख्या कलाकाराला स्क्रीनवर अश्लील डायलॉग म्हणायला जर काहीच हरकत नसेल तर मला का वाटावी म्हणून उपेंद्र लिमये या चित्रपटासाठी तयार झाले. तर मृण्मयी गोडबोले हिने या चित्रपटात डॉक्टरची भूमिका निभावली आहे. दरम्यान चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहाबाहेर दिवसेंदिवस तरुणाईची गर्दी वाढत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे आठ दिवस झाले आहेत. या आठ दिवसात एनिमलने बॉक्सऑफिसवर छप्परफड कमाई केलेली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला त्यादिवशी ६३.८० कोटींचा गल्ला या चित्रपटाने कमावला .
तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ६६.२७ कोटींचा गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. त्यामुळे अवघ्या १०० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट दोन दिवसातच त्याचा झालेला खर्च भरून काढताना दिसला. तिसऱ्या दिवशी रविवार असल्याने ७१.४६ इतकी भक्कम कमाई या चित्रपटाने केली होती. चौथ्या दिवशी ४३.९६ कोटी, पाचव्या दिवशी ३७.४७ कोटी , सहाव्या दिवशी ३०.३९ कोटी,सातव्या दिवशी २४.२३ कोटी आणि आठव्या दिवशी २३.५० कोटी असे आठ दिवसात एकूण ३६१.०८ कोटींची कमाई या चित्रपटाने केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यात हा चित्रपट ५०० कोटींच्या घरात मजल मारणार असे बोलले जात आहे. एनिमल चित्रपटासोबत त्याच दिवशी विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला “सॅम बहाद्दूर” हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ४२.०६ कोटींची कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी सॅम बहादूरला थंड प्रतिसाद मिळाला होता पण त्यानंतर कमाईचा आकडा वाढत जाताना दिसला. अर्थात एनिमलला मिळत असलेला प्रतिसाद सॅम बहादूरला कुठेतरी मागे टाकताना दिसला हीच या देशाची शोकांतिका म्हणावी लागेल.