अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूडमध्ये गाण्यासाठी घ्याल तर… मनसेच बॉलीवूड निर्मात्यांना खुलं चॅलेंज
काही दिवसांपूर्वी ‘दिल दियां गल्ला’, ‘मैं रंग शरबतों का’ आणि यासारखी लोकप्रिय गाणी गाणारा अतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे अशी बातमी जाहीर करण्यात आली. पाकिस्तानच्या कुठल्याही कलाकारांना भारतात काम मिळणार नाही त्यांच्या वर बंदी घालण्यात यावी हे मनसेचे धोरण होते. पण नुकतेच त्या कलाकारांवरची बंदी उठवण्यात आली असल्याचे हिंदी वृत्त माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. वर्ल्डवाइडने दिलेल्या वृत्तानुसार, ‘९० लव्ह स्टोरी’चे निर्माते आणि वितरक हरेश संगानी आणि धर्मेश संगानी यांनी याबद्दलची त्यांची उत्कंठा शेअर केली आहे. ते म्हणाले की, ‘अतिफ अस्लमने ७ ते८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बॉलिवूड सृष्टीत पुनरागमन करणे ही खूप आश्वासक गोष्ट आहे. आम्ही खूप आनंदी आहोत कारण त्याने आमच्या ‘९० लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील पहिले गाणे गायले होते .
अतिफ अस्लमचे चाहते या नवीन गाण्यासाठी खूपच उत्सुक असतील. ७ ते८ वर्षानंतर तो आमच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.” अशी माहिती जाहीर करण्यात आली. याशिवाय, निर्मात्यांनी खुलासा केला की अतिफने त्यांच्या चित्रपटात फक्त एकच गाणे गायले आहे, जे एक रोमँटिक गाणं असणार आहे आणि चित्रपटाच्या शीर्षकाला योग्य असेल. ‘हे गाणे प्रेक्षकांना आनंद देणारे ठरेल आणि २०२५ मध्ये खूप हिट होईल’ असा दावाही त्यांनी केला आहे. पण या बातमीनंतर मनसेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो आहे. अमेय खोपकर यांनी अतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूड सृष्टीत पदार्पण करतोय हे पाहून निर्मात्यालाच थेट इशाराच दिला आहे.
अमेय खोपकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निर्मात्यांना ईशारा देताना म्हटले आहे की , “अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय”.