झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका रंजक घडामोडींमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. अक्षराने घेतलेल्या धाडसी निर्णयाला अधिपतीची साथ मिळत आहे त्यामुळे मालिकेला एक नवे वळण मिळाले आहे. आज मालिकेतील नायिकेची आई म्हणजेच अभिनेत्री रुपलक्ष्मी शिंदे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. रुपलक्ष्मी शिंदे या गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. मालिका सृष्टीत नायिकेची आई अशी त्यांनी एक ओळख बनवलेली पाहायला मिळते.जीव झाला येडा पिसा, मन उडू उडू झालं आणि आता तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत त्यांनी या भूमिका गाजवलेल्या आहेत. रुपलक्ष्मी शिंदे या पूर्वाश्रमीच्या रुपलक्ष्मी चौगुले. त्यांचे वडील सुरमणी प्रा दत्ता चौगुले हे बासरीवादक, गायक, संगीतकार, दिग्दर्शक तसेच अभिनेते म्हणून ओळखले जात.
तर आई प्रा डॉ चारुदत्ता चौगुले या लेखिका, अभिनेत्री तसेच निवेदिका म्हणून ओळखल्या जात. या कलाकार दाम्पत्याच्या पोटी रुपलक्ष्मीचा जन्म झाला. प्रा दत्ता चौगुले यांनी देशविदेशात बासरीवादनाचे कार्यक्रम केले. त्यांच्या घरी मोठमोठ्या कलाकारांच्या मैफिली रंगत असत. रुपलक्ष्मी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. परभणीला शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढे नाट्यशास्र विभागातून मास्टर्स ऑफ ड्रामॅस्टीकची पदवी मिळवली. डॉ दिलीप घारे, डॉ लक्ष्मण देशपांडे ,प्रा वामनकेंद्रे अशा दिग्गजांकडून त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन मिळत गेले. अभिनयाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये जायचे होते पण वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यानंतर रुपलक्ष्मी यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. लग्न ,घर संसार यातच रुपलक्ष्मी यांचे मन रमले. पण पुढे त्या कुटुंबासह मुंबईत राहायला आल्या.
तेव्हा त्यांच्या अभिनयाला वाव मिळू लागला. सखी सह्याद्री , तांदळा, खोपा अशा चित्रपट दूरदर्शनवरील कार्यक्रमात सूत्रसंचालन तसेच अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. रुपलक्ष्मी यांची मुलगी सानिका शिंदे हीने देखील बालवयात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. तांदळा चित्रपटात सानिकाने बालकलाकार म्हणून काम केले होते. तर वेगवेगळ्या वाहिन्यांवर तिने छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. सानिका उत्कृष्ट नृत्यांगनाही आहे.? भरतनाट्यम मध्ये तिने एमए चे शिक्षण घेतले आहे. मानसशास्त्र आणि इतिहास विषयातून तिने पदवी मिळवली आहे. कालिदास, खजुराहो अशा महोत्सवात तिने नृत्याची कला सादर केली आहे.