मराठी सृष्टीतील बरेचसे लोकप्रिय कलाकार लग्नबांधनात अडकताना दिसणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिना हा या सेलिब्रिटींसाठी खास ठरला आहे. अभिनेता अंबर गणपूले आणि शिवानी सोनार यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. तर कौमुदी वालोकर, शाल्व किंजवडेकर, किरण गायकवाड, वैष्णवी कल्याणकर, अंकिता वालावलकर हेही लग्नाच्या तयारीत पाहायला मिळत आहेत. याच जोडीला हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री हेमल इंगळे हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
हेमल इंगळे हिने नुकतेच सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा २ चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली होती. याच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तिचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे आता हेमलला तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. लवकरच हेमलचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण त्यागोदर त्यांच्या एकत्रित केळवणाचा थाट सजलेला पाहायला मिळत आहे. हेमल इंगळे आणि रौनक चोरडिया या दोघांचे केळवण त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी साजरे केले आहे. यावेळी दोघांचे औक्षण करण्यात आले.
हेमल इंगळे बद्दल सांगायचं तर ती मूळची कोल्हापूरची आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगचे वेध लागले होते. याचदरम्यान तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला. मिस युनिव्हर्सिटी इंडिया २०१५, मिस अर्थ इंडिया फायर २०१६ आणि मिस इंडिया एक्सक्झिट-क्वीन २०२७ या सौंदर्य स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. हुशारु हा तिने अभिनित केलेला पहिला तेलगू चित्रपट ठरला. त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी अभिनय बेर्डे सोबत ‘अशी ही आशिकी’ मध्ये तिला मुख्य भूमिका देऊ केली. रूपनगर के चिते, उनाड अशा चित्रपटात ती झळकली आहे. हेमल इंगळे आणि रौनक चोरडिया हे दोघेही कोल्हापूरचे आहेत त्यामुळे हे लग्न कुठे पार पडणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. दोघांच्या मेंदी, हळदीचा सोहळा खूप खास असणार हे वेगळे सांगायला नको.