मी खूप कमी वयातच आईचा रोल करायला लागले पण… जाहिरातीत कॉर्नफ्लेक्स मधलं दूध हे कधीच दूध नसतं त्याऐवजी
डॉ गिरीश ओक यांची लाडकी लेक गिरीजा ओक वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाली. गिरीजाने जाहिरात, चित्रपट, नाटक, सूत्रसंचालन अशा माध्यमातून चौफेर मुशाफिरी केली आहे. जाहिरातीतील सोज्वळ आणि समजूतदार आईचा चेहरा म्हणून तिच्या वाट्याला नेहमी तशाच जाहिराती आल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात मार्केट अर्बन मॉम अशी एक ओळख तिची बनलेली आहे. जाहिरातींचे वास्तव गिरीजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला जे दाखवलं जातं प्रत्यक्षात ते तसं मुळीच नसतं असं ती या जाहिरातींबद्दल म्हणते. गिरीजाने याचा खुलासा करताना म्हटले आहे की, मला अडीच वर्षांची आल्यापासून जाहिराती पाहण्याचं वेड होतं, ‘जीलाती ‘ असं मी बोबड्या बोलात म्हणायचे पण घरच्यांना मी काय म्हणते हेच कळत नसायचं.
मी १२ वर्षांची असताना पहिली जाहिरात केली होती. सॅव्हलॉन गर्ल म्हणून मला शाळेत चिडवायचे. त्यानंतर यंग मॉम हवी या वयात जेव्हा मी गेले तेव्हा ८५ ते ९० जाहिराती केल्या. मदर डेअरी या जाहिरातीवेळी मी प्रेग्नंट होते ती जाहिरात खूप गाजली. मी खूप कमी वयातच आईचा रोल करायला लागले पण त्यात मला काहीच वेगळं वाटत नव्हतं. मी ती आई असते जिला च्यवनप्राशबद्दल सगळं माहीत असतं. मला वेगळ्या भूमिका कधी मिळाल्याच नाहीत सगळ्यातलं सगळं माहीत असलेली आई अशा भूमिका मी केल्या. एखाद्या दिग्दर्शकाने मला जर मुलाला बोलवायला सांगितलं तर मी ओरडून म्हणेन ए कर्ट्या इकडे ये…पण हे जाहिरातीत आपण सांगू शकत नाही. तिथे खूप गोड बोलावं लागतं. कॅव्हीटीज, मसूडे , मूहासे, त्वचा, काले लंबे घने हे आपण कधीच शब्द वापरत नाही पण ते आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेले असतात.”. पुढे गिरीजा असेही म्हणते की, “जाहिरातीत दिसणाऱ्या गोष्टी सगळ्या खऱ्या नसतात. घरं, कपडे , डोक्यावरचे व्यवस्थित केस असतात ते कधीच खरे नसतात. प्रॉडक्टचा एक वेगळा सेट असतो ती प्रत्यक्षात आमच्यासमोर नसतं. त्यातलं दूध हे कधीच दूध नसतं ते फेव्हिकॉल असतं. कारण दुधात कॉर्नफ्लेक्स टाकल्यावर ते बुडणार.
आईस्क्रीमच्या जाहिरातीत तर बटाटा वापरला जातो कारण एवढा वेळ शूट केल्यानंतर खरं आईस्क्रीम वितळू शकतं. बटाटा स्मॅश करून त्यात पीठ आणि कलर टाकला जातो. अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात. आताच्या जाहिरातीत वेगवेगळी चेहरे पाहायला मिळतात. जे योग्य आहे कारण आपल्या घरात वेगवेगळ्या टोनची लोकं राहत असतात. घरातली गृहिणी ही डस्की स्किनची असू शकते. मी कटाक्षाने फेअरनेस क्रीमची जाहिरात केली नाही आयुष्यात कारण मला त्याची चीड आहे. मी तंबाखू रिलेटेड कुठली जाहिरात केली नाही.” गिरीजाने जवान चित्रपटात काम केलंय या चित्रपटात मी वेगळी भूमिका केलीये असे ती सांगते. शाहरुख खानबद्दल ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत की तो खूप चांगला माणूस आहे हे सगळं खरं आहे असे गिरीजा म्हणते.