news

‘अ अमेरिकेचा’ कराडच्या महिला यूट्युबरचा अमेरिकेत डंका.. पहा कश्या प्रकारे करतेय हजारो लोकांची मदत

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामुळे आपल्याला घरबसल्या अनेक गोष्टी अवगत होतात. फक्त भारतातच नाही तर परदेशात लोक कश्या प्रकारे राहतात ह्याची उत्सुकता प्रत्येकालाच लावून असते. अश्यात एका मराठी महिला यूट्युबरमुळे भारतातील मराठी युवकांना मोठी मदत मिळत आहे. गौरी सागावकर-देशमुख यांचा ‘अ अमेरिकेचा’ हा युट्युब चॅनल सध्या चांगलाच चर्चेत आहे. अमेरिकेतल्या नवीन गोष्टी, तंत्रज्ञान, परंपरा, सणवार, प्रेक्षणीय स्थळं, इथली संस्कृती अशा गोष्टींचं माहिती त्या नेहमीच देताना पाहायला मिळतात. गौरी सागावकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घायची इच्छा अनेकांना आहे. त्यावर त्या म्हणतात.. ” मी गौरी सागावकर-देशमुख. माझं मूळ गाव पाटण तालुक्यातील ढेबेवाडी. पण आम्ही स्थायिक झालो कराड मध्ये. माझं शालेय शिक्षण कराडच्या कन्या प्रशालेत झालं आणि कॉलेज सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. इथे मी अर्थशास्त्रात एम ए केलं आणि त्यानंतर साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयातून एम एस डब्लू हे समाजकार्यातील पदव्युत्तर पदवी घेतली. त्याच वर्षी NET ही क्वालिफाय झाले आणि मग पुढे माझे लग्न झालं.

Avinash and Gauri Sagaonkar Deshmukh
Avinash and Gauri Sagaonkar Deshmukh

आमचं लव्ह मॅरेज लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आम्ही रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरांच्या संमतीने फक्त तीस लोकांच्या उपस्थितीत आमचं लग्न झालं. अविनाश मूळचा साताऱ्याचा पण आम्ही लग्नानंतर दोघांच्याही नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहायला गेलो. मी भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या ‘निर्माण’ या संस्थेत ‘रिसर्चर अँड डॉक्युमेंटेशन ऑफिसर’ या पदावर काम करत होते. अविनाश टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये आय टी क्षेत्रात काम करत होता. याच कंपनीतर्फे त्याला अमेरिकेत ऑनसाईट जाण्याची संधी मिळाली. मग डिसेम्बर 2019 मध्ये अविनाश मी आणि आमचा एक वर्षाचा मुलगा बिल्व असे आम्ही तिघे अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यात राहायला आलो. आम्ही ज्या दिवशी इथे उतरलो त्या दिवशी उणे 20 अंश सेल्सिअस एवढे भयानक तापमान होते. मिनेसोटा हे अमेरिकेतील एक अतिथंड राज्य म्हणून ओळखले जाते त्यामुळं पाहिलं आव्हान होतं ते या थंडीशी जुळवून घेण्याचं. पण हळूहळू याची सवय झाली. इथे पावलोपावली मदत करणारी माणसं भेटत गेली त्यामुळं सेटलमेंट अजिबात कठीण गेली नाही. भारतातल्याप्रमाणं सर्व किराणा सामान मिळत असल्यामुळं खाण्यापिण्यातही कोणतीही तडजोड करावी लागली नाही. सुरुवातीला अनेक गोष्टी नवीन होत्या त्यामुळं आश्चर्य वाटायचं जसं की इथली वजन मापं वेगळी, एककं वेगळी, अमेरिकन दुकानातल्या वस्तू वेगळ्या, सण समारंभ वेगळे पण यानिमित्तानं शिकायला खूप मिळालं. इथे आल्यावर दुसऱ्याच महिन्यात एक कटू अनुभव आला. आमचा बिल्व नुकताच चालायचा शिकला धावायला होता त्यामुळं तो धडपडत पळायचा. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. त्यात इथली घर लाकडाची त्यामुळं थोडं चाललं तरी खाली राहणाऱ्या माणसांना त्रास व्हायचा. बिल्व असाच खेळता खेळता पडला आणि आमच्या खाली राहणाऱ्यांची थेट पोलिसांना फोन केला. तक्रार केली की, वर राहणाऱ्या माणसांचा आम्हाला त्रास होतो. दोन पोलिसगाड्या दुसऱ्या मिनिटाला सोसायटी मध्ये आल्या. दारात पोलिसांना बघून आम्ही घाबरलो आणि एक वर्षाचं बाळ जे सतत चालण्याचा खेळण्याचा प्रयत्न करतं त्याचा आवाज येतो फक्त, अशी आमची बाजू सांगितली. पोलीस भले होते. त्यांनीही काळजी घ्या, बाळाला बाहेर खेळायला न्या अशा सूचना दिल्या. तो काळ कोविडचा होता. त्यामुळं फारसं घराबाहेर पडता यायचं नाही. सहा सात महिन्यात आम्ही घर बदललं आणि ग्राउंड फ्लोअर अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झालो. दरम्यान स्वतःचं युट्युब चॅनल असावं असं भारतात असल्यापासूनच वाटायचं ती संधी इथे आल्यावर मिळाली. बिल्व छोटा असल्यामुळं मी बाहेर जाऊन काम करण्याचा विचार केला नव्हता. सुरुवातीला मी फेसबुकवर आले. तोपर्यंत माझं फेसबुक अकाउंट सुद्धा नव्हतं. मी फेसबुकवर माझ्या अनुभवांचे लेख लिहायचे आणि हळूहळू ते खूप लोकप्रिय व्हायला लागले. लोक युट्युब चॅनल सुरु करण्याविषयी सुचवू लागले.

avinash and gauri in amerika
avinash and gauri in america

शाळा महाविद्यालयात असताना मी भाषण स्पर्धेत भाग घ्यायचे. राज्यस्तरापर्यंतची एकूण 86 बक्षिसं माझ्याकडे आहेत. त्यामुळं बोलण्याचा हा अनुभव होताच पण बाळ फक्त दोन वर्षाचं असल्यामुळं आपल्याला चॅनलचा व्याप जमणार नाही असं वाटायचं. एके दिवशी अचानक अविनाशने गो प्रो कॅमेरा गिफ्ट दिला आणि उद्यापासून चॅनल सुरु कर म्हणून सांगितलं त्याक्षणी जन्म झाला आमच्या अ अमेरिकेचा या युट्युब चॅनलचा. अमेरिकेतल्या नवीन गोष्टी, इथलं तंत्रज्ञान, परंपरा, सणवार, प्रेक्षणीय स्थळं, इथली संस्कृती अशा गोष्टींचं माहिती मराठी भाषेत आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं व्हिडीओज करत गेलो आणि आज बघता बघता दोन लाखांचं सबस्क्राइबर्सचं कुटुंब पूर्ण होत आलं आहे. वैयक्तिक किंवा कौटुंबिक व्हिडीओ न करता नेहमी माहितीपूर्ण व्हिडीओज करण्याचा आमचा प्रयत्न असतो हेच चॅनलच्या यशाचं गमक आहे. चॅनलच्या कम्युनिटी टॅबवर मी अधून मधून लेखही लिहीत असते तेही वाचकांना खूप आवडतात. लवकरच या लेखांचं एक पुस्तक प्रकाशित करावं, असा मानस आहे. आमच्या सोबत इतरही युट्युबर्सनी पुढं जावं यासाठी त्यांच्या चॅनेल्सचे फ्री प्रमोशनही आम्ही अ अमेरिकेचा वर करत असतो. जुलै 2021 मध्ये चॅनल सुरु असतानाच अमेरिकेतल्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी विग तयार करणाऱ्या एका संस्थेविषयी कळलं. त्यांना मी माझे दीड फूट केस दान केले. यावर्षी पुन्हा एकदा भारतातल्या मदत चॅरिटेबल ट्रस्ट या कॅन्सरग्रस्तांसाठीच काम करणाऱ्या संस्थेला केस दान केले. आपण समाजाचं नेहमीच देणं लागतो त्यामुळं जमेल ते आणि तितकं समाजकार्य करायला आम्हाला दोघांनाही आवडतं. अमेरिकेत आल्यानंतर दोन वर्षानंतर अविनाश ने जॉब बदलला आणि अमेझॉन ही नामांकित कंपनी जॉईन केली.

a amerikecha gauri sagaonkar deshmukh
a amerikecha gauri sagaonkar deshmukh

सुरुवातीला आम्ही भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये राहायचो पण दोनच वर्षांत स्वतःचे प्रशस्त घर घेतले. आम्हाला दोघांनाही झाडांची विशेष आवड आहे त्यामुळं घरात आणि घराबाहेर अंगणात परसात आम्ही बरीच झाडे लावली आहेत. आम्ही राहतो त्या कॉलनीत एकही भारतीय घर नाही. पण आमचे अमेरिकन शेजारी खूप चांगले आहेत. गेल्या वर्षी बर्फाचं वादळ आलं तेव्हा आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली. येताजाता त्यांच्याशी गप्पाही होतात अगदी आपल्या भारतात होतात तशाच. आम्हाला पर्यटनाचाही छंद आहे. तोही आम्ही जोपासतो. आम्हीही फिरतो आणि ती ठिकाणं प्रेक्षकांनाही दाखवतो. तीनच महिन्यांपूर्वी आम्ही भारतात आलो होतो तेव्हा कराडमध्ये सबस्क्राइबर्स मीट घेतली. या स्नेहभेटीला अडीचशे सबस्क्राइबर्स उपस्थित राहिले होते. हा सोहळा म्हणजे प्रेक्षक चॅनलवर आणि आमच्यावर करत असलेल्या प्रेमाची साक्ष होती. समजा कोणी अमेरिकेत येणार असेल आणि आम्हाला त्यांनी तसे कळवले तर आम्ही शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. मग ही मदत इथली माहिती पुरविण्यापासून ते इथे सेटल होण्यासाठीच्या सर्व गोष्टी करून देण्यापर्यंत कोणत्याही स्वरूपाची असते. मिनेसोटा मध्ये येणाऱ्या आमच्या कितीतरी सबस्क्राइबर्सना अविने एअरपोर्ट वरून पीक करून, किराणा व अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून देऊन ते त्यांना घर बघून देण्यापर्यंत सर्वतोपरी मदत केली आहे. आपण भारतीय आहोत आणि “एकमेका सहाय्य्य करू” ही आपल्या मातीची शिकवण आहे ती सगळ्यांनी जपली पाहिजे, असं मनापासून वाटतं. भारत ते अमेरिका आणि अमेरिका ते युट्युब चॅनलच्या या यशस्वी प्रवासात फक्त आमच्या कुटुंबीयांचाच नाही तर ज्ञात अज्ञात अशा कितीतरी जणांचा वाटा आहे आम्ही त्या सगळ्यांविषयी कृतज्ञ आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button