साक्षी कसबे नावाच्या मुलीने मला फोन केला….फसवणूक होत असल्याचे कळताच अभिनेत्रीने कलाकारांना केलं अलर्ट
सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. पैशांच्या बाबतीत असो किंवा सोशल अकाउंट हॅक करणे या गोष्टी आता सर्रास पाहायला मिळतात. पण आता या हॅकर्सने कलाकारांना टार्गेट करण्यासाठी आणखी एक युक्ती आखली आहे. आपली फसवणूक होतेय हे लक्षात येताच या अभिनेत्रीने सगळ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मराठी हिंदी मालिका तसेच चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका साकारणारी अपूर्वा चौधरी सध्या कलर्स मराठीच्या इंद्रायणी मालिकेत काम करत आहे. तिच्या बाबतीत काल एक घटना घडली त्यावरून तिने तिच्या सह कलाकारांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
अपूर्वा याबद्दल एक सविस्तर व्हिडीओ शेअर करते त्यात ती म्हणते की, ” कालचाच अनुभव आहे तुम्ही जर ऍक्टर ऍक्ट्रेस असाल किंवा इन्फ्लुएन्झर असाल तर तुम्ही कोलॅबरेशन किंवा पेड कोलॅबरेशन करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा..” साक्षी कसबे नावाची माझी कॉस्टयुम डिझायनर आहे, तिच्या इन्स्टाग्रामवरून मला सकाळी एक मेसेज आला की आमच्या कंपनीसोबत तुम्ही पेड कोलॅबरेशन कराल का?. मीही तिला ok म्हणून मेसेज दिला. मी असं याअगोदर देखील केलं आहे. तिने मला माय प्लिजच्या पेजची लिंक पाठवली आणि या पेजच्या दोन स्टोरी तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही इन्स्टाग्राम स्टोरीवर २४ तासांसाठी ठेवा. त्यावर मी त्या ठेवल्या तेव्हा तिने मला स्कॅनर मागितला. माझा नंबर तिच्याकडे होता, ती ओळखीची होती आणि तिच्यावर विश्वास असल्याने मी तो स्कॅनर तिला पाठवला.एक मोठी चांगली अमाउंट टाकून त्यांनी फोन पे चा एक स्क्रीन शॉट मला पाठवला. ‘तुमची माहिती कंपनीकडे पोहोचली आहे तेव्हा फक्त व्हेरिफिकेशन साठी ‘तुम्ही तुमच्या प्रायव्हेट अकाउंटच्या इमेल आयडीच्या जागी आमचा इमेल आयडी टाका’. तो इमेल आयडी होता व्हेरिफाय फोन पे 2 जि मेल डॉट कॉम . तेव्हा मला याबद्दल शंका आली.
त्यांचा इमेल आयडी टाकून माझं व्हेरिफिकेशन कसं काय होईल?. असा प्रश्न केल्यावर त्यांनी मला काही स्क्रीनशॉटचे पुरावे दाखवले की या या लोकांनी असं केलं आहे त्यांना आम्ही पैसे दिले आहेत. माणुसकीवर विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी खोट्या नसतात असे त्यांनी मला समजावले. त्याचवेळी मला कळलं की हे फ्रॉड आहे. मी त्यांना ओकेचा मेसेज केला. त्यानंतर मी स्टोरीज डिलीट केल्या आणि साक्षी कसबेच्या नंबरवर फोन केला. तिने फोन उचलला नाही पण थोड्या वेळात तिचाच फोन आला. तिने मला सांगितलं की ताई माझं अकाउंट हॅक झालंय. या फ्रॉडची तिने स्टोरी ठेवली होती पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही म्हणून मग तिनेही मला या फ्रॉडबद्दल सगळ्यांना जागरूक करण्यास सांगितलं. मी त्या पेजला सर्व स्क्रीन शॉट पाठवून कळवलं आहे त्यांनीही याबद्दल दखल घेतली आहे आणि मीही साक्षी कसबेच्या अकाउंटला रिपोर्ट केला आहे. तुम्हालाही जर तिच्याकडून काही यासंदर्भात मेसेजेस आले तर सतर्क राहा.”