तारुण्य आणि वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवंय? कलाकारांच्याबाबतीत प्रसिद्ध अभिनेत्रीने भीती केली व्यक्त
सध्या मराठी सृष्टीतही AI या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. लवकरच महेश कोठारे या तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणू पाहत आहेत. पण चित्रपटाच्या बाबतीतच नाही तर आता मालिका सृष्टीतही हे प्रयोग होऊ लागले आहेत. सोनी मराठी वाहिनीवर सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी सृष्टीत AI चा वापर केला जात आहे. सुबोध भावेला तरुण दाखवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल की नाही हे मालिका पाहिल्यावरच स्पष्ट होईल. ऑन हे तंत्रज्ञान वापरल्याने एका मोठ्या नुकसनाला सामोरे जावे लागणार अशी एक भीती प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. तिने हे तंत्रज्ञान वापरण्यावरच आक्षेप घेतला आहे.
अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे ही सध्या झी मराठीच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत काम करत आहे. पुढचं पाऊल या मालिकेपासून शर्मिला शिंदे ही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. एक अभिनेत्री म्हणून काम करत असताना AI सारख्या तंत्रज्ञानामुळे कलाकारांच्या कामावर गदा येऊ शकते अशी भीती तिने व्यक्त केली आहे. याबद्दल ती म्हणते की, ” कृपया AI चा वापर टाळा आणि हाडामासाचे कलाकार कास्ट करा. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा बघितला नाहीये. पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे आणि आदीश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय. ” शर्मिला तिच्या या ठाम भूमिकेबद्दल असेही म्हणते की, ” एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवंय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परीस्थितींमध्ये गरजे पुरता किंवा मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो.”
पण सर्वच ठिकाणी तुम्ही AI चा वापर करणार असाल तर कलाकारांना काम मिळणे कठीण होईल असेच एक मत शर्मिलाने मांडले आहे. तिच्या या मतावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भविष्यात कलाकारांना काम मिळणे कठीण होईल. दरम्यान आताची परिस्थिती पाहता डबिंग आर्टिस्टनाही काम मिळत नाहीये. परिणामी भविष्यात कलाकारांना काम मीळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. चालत्या बोलत्या कलाकाराला संधी मिळावी याच उद्देशाने शर्मिलाने ही पोस्ट लिहिली आहे. जेणेकरून भविष्यात कला क्षेत्रात बेरोजगारी वाढू नये असेच तिने यातून सुचवले आहे. केवळ अभिनेता म्हणून नाही तर त्यामागे काम करणाऱ्या हातांनाही डावलले जाण्याची शक्यता आहे. सहजसोप्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा आहे त्या कलाकारांना योग्य ती संधी मिळावी अशीच तिने अपेक्षा व्यक्त केली आहे.