
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे. त्यांचे चित्रपट बनावेत, देशभरात पोहोचवेत यासाठी अनेक कलाकार मोठे प्रयत्न करताना दिसतात. छावा हाही त्याच कलाकृतीपैकी एक म्हणावा लागेल. गेल्या १४ फेब्रुवारी पासून छावा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी ओसंडत आहे. आपल्या राजाचा इतिहास जवळून जाणून घेण्यासाठी अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाने तमाम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. हे शक्य झालं ते अभिनयाने कसदार असलेल्या कलाकारांमुळे आणि पटकथा लेखक, दिग्दर्शकामुळे.
विकी कौशलचा अभिनय तर वाखाणण्याजोगा आहे पण त्याच जोडीला आपल्या मराठी कलाकारांचाही या चित्रपटातला अभिनय तोडीसतोड ठरला आहे. छावा चित्रपटात तुम्हाला अनेक मराठी चेहरे बघायला मिळतील. बहिर्जी नाईक या भूमिकेनेही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला तुम्ही ओळखलं असेलच. ही भूमिका अभिनेते शिवराज वाळवेकर यांनी साकारली आहे.

शिवराज वाळवेकर यांनी बहिर्जी नाईक साकारताना महाराजांना मदत करताना विविध वेशभूषा रंगवल्या. शिवराज वाळवेकर यांनी याअगोदर मराठी मालिका, चित्रपटातूनही दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. व्यवसायिक जाहिरातूनमध्येही ते पाहायला मिळाले. तान्हाजी, रौदळ, मिशन मजनू, ब्रह्मास्त्र, धर्मवीर, दगडी चाळ, मी शिवाजी पार्क अशा चित्रपटातून त्यांनी सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता छावा चित्रपटातील बहिर्जी नाईक म्हणून ते लोकप्रियता मिळवत आहेत.