त्यांचा चेहरा दाखवला म्हणून शिव्या खातोय…मी त्यांचं आयुष्य बरबाद नाही केलं पण जर अजून १५ मिनिटांनी तिथे
काही दिवसांपूर्वी मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील वेताळ टेकडीवरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. रमेश परदेशी हे वेताळ टेकडीवर चालण्यासाठी गेले होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांना दोन तरुणी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. मद्यपान किंवा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या या दोन तरुणींचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि अशाच बाहेर शिकण्यासाठी आलेल्या मुलींच्या पालकांना सतर्क राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बाहेरगावी शिकणाऱ्या मुलांबाबत काळजी व्यक्त केली होती. याबद्दल बरीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. तिथल्या काही तरुण तरुणींच्या मदतीने त्या दोन्ही मुलींना त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण या व्हिडीओ मुळे रमेश परदेशी यांना टिकेला देखील सामोरे जावे लागले.
त्या मुलींचे चेहरे का नाही लपवले? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात येऊ लागले. यानंतर रमेश परदेशी यांच्याविरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर रमेश परदेशी पुन्हा एकदा समोर आले आहेत. मी जर तिथे गेलो नसतो तर आणखी काही विपरीत घडलं असतं असं त्यानी रोखठोक मत इथे मांडलेलं पाहायला मिळालं. टीकाकारांना उत्तर देताना ते म्हणतात की, ” ह्याला अक्कल नाही का? स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात त्या दोन मुलीचं आयुष्य बरबाद केलं ….मी त्यांचं आयुष्य बरबाद नाही केलं तर त्यांचं आयुष्य वाचवलं आहे. आणि मी हे जबाबदारीने बोलतोय कारण त्या ज्या ठिकाणी पडल्या होत्या, बरोबर १५ मिनिटांनी अंधार होईल आता. तिथं ते कोणालाच कळलं नसतं की त्या पडल्यात. शनिवारचा दिवस त्याच्या चारी बाजूला असलेल्या वस्त्या, आणि त्या वस्त्यांमधून तिथं दारू प्यायला येणारी मुलं… इथं बसलेल्या सर्व महिला विचार करू शकता जर आपलं लक्ष तिथे नसतं गेलं आणि त्या जर इतरांच्या तावडीत गेल्या असत्या तर आता मी त्यांचा चेहरा दाखवला म्हणून इथं शिव्या खातोय नंतर ऐकायला कोण राहिलं असतं.
ही जबाबदारी मला त्यावेळी योग्य वाटली, मी ती केली. मी त्यांचा जीव वाचवणं गरजेचं वाटलं मी ते केलं. ” रमेश परदेशी यांच्या या स्पष्टीकरणाचे नेटकऱ्यांनी समर्थन केले आहे. केवळ मुलींचे चेहरे दाखवले म्हणून ते चुकीचे ठरले. यामागे त्यांचा वाईट हेतू मुळीच नव्हता. पालकांनीही आपली मुलं बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. कुठल्याही आईवडिलांना आपली मुलं वाईट मार्गाला जावीत असा हेतू नसतो. तर मुलांनीही जबाबदारीने वागायला हवं हे यातून शिकायला हवं. मलाही एक मुलगी आहे आणि त्या मुलींना पाहून जर त्या पालकांची जी अवस्था झाली होती तीच माझीही झाली होती. असे रमेश परदेशी त्या व्हिडिओत देखील म्हणाले होते.