बाबांचं असणं हा गर्व होता म्हणत अभिनेत्याने वडिलांना वाहिली श्रद्धांजली…अनेक चित्रपटात बाबांनी आवाज दिला होता
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. नियतकालिकेत स्तंभलेखन तसेच आमचा प्रतिनिधी या मासिकेचे त्यांनी संपादक पद भूषवलं होतं. प्रकाश पायगुडे हे गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते यातच गुरुवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळीच वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश पायगुडे यांचा मुलगा अधिश पायगुडे हा अभिनेता आहे त्याने नाटक, मालिका सृष्टीत विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
अभिनेता अधिश पायगुडे म्हणतो ” बाबांचं असणं हा गर्व होता बाबांचं जाणं ही जबाबदारी आहे…” अशा आशयाची भावुक पोस्ट लिहीत त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रकाश पायगुडे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह तसेच त्यांनी क्रीडा समालोचक म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख होती. सरस्वती मंदिर शाळेतून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले होते. पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन मधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरीगचा डिप्लोमा पूर्ण केला होता. क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आकाशवाणी तसेच दूरदर्शन साठी त्यांनी क्रीडा समालोचक म्हणून काम केले होते.
प्रभात पब्लिसिटी या संस्थेचे ते संस्थापक होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते. स्याटरडे क्लब, रोटरी क्लब , श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आदी संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. राजकिय , सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर असायचा. इतकंच नाही तर प्रकाश पायगुडे यांचा वेगळा आवाज काही फिल्मसाठी वापरला देखील गेला होता. अशा प्रकाश पायगुडे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पायगुडे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच एक ईश्वर चरणी प्रार्थना….