आई कुठे काय करते (aai kuthe kay karte) या मालिकेतील धक्कादायक ट्विस्टमुळे सगळेच चित्र बदलले आहे. लवकरच आशुतोषची या मालिकेतून एक्झिट होत असल्याने अरुंधतीच्या आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा मालिकेतून दाखवला जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीचे हेड सतीश राजवाडे (satish rajwade) यांनी या वळणावर एक भाष्य केले होते की प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि अरुंधतीच्या आयुष्याचा हा टप्पा किती गरजेचा होता ते तुम्ही चूक की बरोबर हे मालिका पाहिल्या नंतरच सांगा असे म्हटले होते. आपल्याला आधारासाठी आई असते पण आईच्या पाठीमागे कोणीच नसतं. जेव्हा सासू सुनेच्या बाजूने उभी राहते तेव्हा हा ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी एक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तर मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख आशुतोषच्या एक्झिट मुळे खूपच भावूक झाले आहेत. हा ट्विस्ट मलाही धक्कादायक वाटला अशी प्रतिक्रिया त्यानी सोशल मीडियावर दिली आहे. मिलिंद गवळी (milind gawali) याबद्दल म्हणतात की, “ओमकार गोवर्धन”(omkar govardhan) याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली !
तीन साडेतीन वर्षांपूर्वी “आईकुठेकायकरते”या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती, अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या आई कुठे काय करते च्या सेटवर जिन्यामध्ये झाली , मी ओमकार ला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत, गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता निळकंठ मास्तर त्या निळकंठ मास्तर च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकर च्या भूमिकेसाठी आई कुठे काय करते मध्ये आला होता , मला त्याला बघून आनंद झाला, कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे, तिचं कास्टिंग कधी चुकत नाही, मी ओमकार ला शुभेच्छा दिल्या, आणि त्याला म्हटलं “वा मजा येणार आता , मला खात्री आहे तू छानच काम करशील ! आणि अगदी तसंच झालं ओमकार ने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला ! मी आणि आप्पा ज्या मेकअप रूम मध्ये होतो त्याच मेकअप रूम मध्येच ओमकार ची सोय करण्यात आली, आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला.
humour काय असतं हे ओमकार कडून शिकावं , सतत प्रसन्न राहणे , हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते Director ला विचारून त्याचा निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं,शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं, पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची, कधी कधी मेकअप रूम मध्ये आप्पा ,अनीश आणि त्याच्यात्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो, आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे, मला माहितीये मी त्याला खूप खूप miss करणार ! जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस feeling आहे, पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व , त्याची अभिनयाची जाण , आणि त्याचं professionalism , त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे! ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा”