नाना पाटेकर यांची भूमिका असलेला वनवास चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने नाना पाटेकरांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. यातीलच एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या लग्नाचाही किस्सा सांगितला आहे. नाना पाटेकर हे रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसले. परखड मतामुळे अँग्री मॅन अशी त्यांची आता सर्वश्रुत ओळख झाली आहे. सध्या नाना पाटेकर पुण्यातील डोणजे गावात वास्तव्यास आहेत. निलकांती पाटेकर या त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत इथेच राहतात.
निलकांती पाटेकर या लेखिका तसेच उत्तम अभिनेत्री आहेत. एकत्र काम करत असतानाच नाना पाटेकर निलकांती यांच्या प्रेमात पडले. एकदा निलकांती माहेरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा एसटी स्टॅण्डवर जाऊन नानांनी त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याकाळी ७५० रुपयांत त्यांनी लग्न केले होते. त्याकाळी नानांना नाटकाच्या एका प्रयोगाचे अवघे ५० रुपये मिळायचे. त्यामुळे घराला हातभार लागेल अशी शाश्वती त्यांना देता येत नव्हती. पण निलकांती पाटेकर या बँकेत नोकरीला होत्या. महिन्याला २ हजार ते २.५ हजार रुपये पगार मिळत असल्याने त्यांनी नानांना खूप सहकार्य केले. लग्नानंतर हनिमूनला जायचं म्हणून ते पुण्याला गेले होते. लग्नानंतर काहीच वर्षात त्यांना पहिलं अपत्य झालं.
पण ते मूल सशक्त नसल्याने अवघ्या दोन वर्षातच त्याचे निधन झाले. देवाने हे माझ्याच नशिबात का दिलं? असा प्रश्न त्यांच्याही मनात कुजबुजला पण मल्हारच्या जन्मानंतर मात्र सगळं काही स्थिरस्थावर झालं. आज मुंबई सारख्या गर्दीपासून दूर जाऊन ते डोणजे गावातील ‘नानाची वाडी’ फार्म हाऊसमध्ये समाधानाने आयुष्य जगत आहेत. बऱ्याचदा बोललं गेलं की नाना पाटेकर पत्नीपासून वेगळे राहतात. पण ते तसं नसून निलकांती याही त्याच फार्महाऊसमध्ये एकत्र राहत आहेत.