मालिका, चित्रपटातून काम करत असताना अनेक कलाकार दिग्दर्शन किंवा निर्मिती क्षेत्राकडे वळतात. मराठी बिग बॉसनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शर्मिष्ठा राऊत हिनेही निर्मिती क्षेत्राचा मार्ग निवडला. तुला शिकवीन चांगलाच धडा अशा मालिकांची निर्माती म्हणून प्रसिद्धी मिळवत असतानाच शर्मिष्ठा चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळली. नाच गं घुमा या चित्रपटाची तिने निर्माती म्हणून काम केले आहे. तिचा हा यशाचा प्रवास सहजसोपा नव्हता. याबद्दल नुकतीच तिने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने तिच्या पहिल्या नवऱ्यापासून घेतलेल्या घटस्फोटाबद्दलही उल्लेख केलेला पाहायला मिळाला. अशातच शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई ललित प्रभाकरला दिले असल्याचे सांगितले.
यामागचे कारण सांगताना ती म्हणते की, मी सुरुवातीला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले. तेव्हा ५०० लोकांच्या घोळक्यात असताना मला २५० रुपये मिळाले होते. गेली कित्येक वर्ष ते पाकीट मी तसंच जपून ठेवलं होतं. पण गेल्या एक दीड वर्षांपासून ते माझ्याकडे नाहीये. कारण ते मी माझ्या भवड्याला ललित प्रभाकरला दिलं आहे. शर्मिष्ठा पुढे असेही म्हणते की, ललीतने आनंदी गोपाळ नावाचा चित्रपट केला होता. त्याचं काम पाहून मी खूप भारावून गेले होते. मी त्याला म्हटलं होतं की तू यापेक्षा काहितरी भारी काम करशील, पण हे जे केलयेस ते खूप भारी आहे. मोठी बहीण म्हणून मला तुला एक बक्षीस द्यायचंय असं मी त्याला म्हटलं तेव्हा त्याने काय? असा प्रश्न विचारला. तेव्हा मी त्याला ते पाकीट दिलं , ही माझी पहिली कमाई आहे ज्यावर ज्युनिअर आर्टिस्ट असं लिहिलं होतं.
मी ते त्याला दिलं तेव्हा त्याला मी म्हटलं की मी हे पाकीट जसं जपून ठेवलंय तसंच तुही ते जपून ठेवशील याची मला खात्री आहे. शर्मिष्ठा राऊत आणि ललित प्रभाकर यांनी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून एकत्रित काम केले होते. त्यात तिने ललीतच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. मालिकेनंतर खऱ्या आयुष्यात देखील त्यांनी हे बहीण भावाचं नातं जपून ठेवलं आहे. भाऊबीज, रक्षाबंधन हा सण दोघेही एकत्र साजरा करत असतात. ललीतच्या कामावर खुश होऊन एका मोठ्या बहिणीच्या नात्याने शर्मिष्ठाने तिची ही पहिली कमाई ललित प्रभाकरला देऊ केली होती.