महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली शिवाली परब हिने नुकताच तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. १० मे २०२४ शिवाली परब हिचा वाढदिवस होता याच दिवशी तिला तिच्या नवीन घरात जाण्याची संधी मिळाली. गृहप्रवेश करणारा शिवालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हक्काचं घर खरेदी केल्याबद्दल शिवालीचं मोठं कौतुक होत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने त्यातील कलाकारांना केवळ प्रसिद्धीच मिळवून दिली नाही तर त्या कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम या शोने केलेलं आहे. आणि म्हणूनच या शोमधील कलाकार मंडळी चार चाकी गाडी ते हक्काचं घर खरेदी करू शकली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर या कलाकारांनी हक्काचं घर तसेच चार चाकी गाडी खरेदी करून आनंदाची बातमी चहत्यांसोबत शेअर केली होती.
त्यात आता सर्वांची लाडकी शिवाली परब हिनेही तिच्या हक्काच्या घरात प्रवेश केलेला आहे. शिवाली परब ही शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. घरची परिस्थिती हलाकीची असूनही तिने दहावीत उत्तम गुण मिळवले होते. बारावी शीकरणारी ती त्यांच्या घरातील एकमेव सदस्य होती. कॉलेजमध्ये असताना शिवालीने नोकरी करावी असा तिच्या घरच्यांचा विचार होता. पण शिवालीला नाटक, एकांकिका याचे वेड जास्त होते आणि यातच करिअर करायचं असं तिचं ठाम मत होतं. पण वडिलांच्या इच्छेखातर तिने नोकरी केली. पण याचदरम्यान शिवाली एसवायला नापास झाली. नाटक मिळत नाही म्हणून ती खूप खचली होती त्यात नापास झाल्याने आता सगळं संपलं म्हणून ती रडू लागली. पण कुठेतरी चांगलं घडतं याच विचाराने ती नोकरी करत असताना तिला एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
नम्रता संभेराव सोबत तिला हे नाटक मिळाले आणि त्यानंतर मात्र नम्रतामुळेच शिवालीला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये येण्याची संधी मिळाली. हा शिवालीच्या आयुष्यातला महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. प्रेक्षकांना हसवता हसवता शिवाली चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकली. यातूनच नाटक, चित्रपट असा तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर आता आपल्या हक्काचं घर असावं म्हणून तिने प्रयत्न केला. आणि तिचा हा प्रयत्न देखील यशस्वी ठरला. वाढदिवसाच्या दिवशीच शिवालीने तिच्या या नवीन घरात गृहप्रवेश केल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला आहे.