मला ते सहन झालं नाही आत्महत्या करण्यासाठी मी टेरेसवर गेलो तेंव्हा … वडिलांच्या निधनांनंतर प्रथमच गश्मीरने सांगितला धक्कादायक प्रसंग
१४ जुलै २०२३ रोजी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली होती. पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात ते एकटे राहत असल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या घटनेनंतर महाजनी कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला. पण नाण्यालाही दोन बाजू असतात असे मत गश्मीर महाजनी कडून व्यक्त करण्यात आले. लोकांकडून होत असलेले आरोप प्रत्यारोप खोडुन काढण्यासाठी त्याने सर्वतो प्रयत्न केले. माधवी महाजनी यांनी तिसरा अंक हे आत्मचरित्र लिहून अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यांची मतं पटली तर अनेकांनी टीकेची झोड सुरूच ठेवली.
पण एक क्षण असा आला जेव्हा या टीकेचा गश्मीरच्या मनावर गंभीर परिणाम झाला. आपलं आयुष्य संपवावं असा टोकाचा निर्णय त्याच्या मनात आला. गश्मीर महाजनी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. आरोप प्रत्यारोपाचा परिणाम म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. पण नंतर मुलाकडे पाहून त्याने हा विचार मागे घेतलेला पाहायला मिळाला. याबद्दल गश्मीर म्हणतो की, ” वडिलांचं निधन झालं त्यानंतर दोन आठवड्याने आमचे घरात वाद झाले. माझं आईसोबत खूप मोठं भांडण झालं , तेव्हा मला प्रचंड राग आला होता. तुम्हाला कधी असं वाटतं की आयुष्य संपवून टाकावं असच माझ्या बाबतीत झालं पण शेजारच्या बेडरूममध्ये माझा मुलगा झोपलेला नसता तर कदाचित मी माझं आयुष्य संपवलं असतं. आई बरोबर वाद झाला तेव्हा मला खूप राग आला होता . या वादानंतर मी टेरेसवर गेलो होतो. पण नंतर माझ्या मनात विचार आला की आपल्याला ५ वर्षांचा मुलगा आहे आणि त्याला वाढवण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्यावेळी पहिल्यांदा आयुष्य संपवून टाकावं असा माझ्या मनात विचार आला होता. पण कधी कधी अशा गोष्टी आपल्याला हाताळता येत नाही. आणि त्या बाबतीत आपण कोणाशी मोकळेपणाने बोलुही शकत नाही.”
रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर कित्येक दिवस त्यांच्या कुटुंबावर आरोप होत होते. त्याचाच एक परिणाम म्हणून की काय आई आणि मुलामध्ये एक टोकाचा वाद झाला. त्याचमुळे गश्मीरने एका क्षणात टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. पण खूप कमी वयातच जबाबदारीचं ओझं स्वीकारणारा गश्मीर या परिस्थितीशी जुळवून घेताना दिसला. टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा परिस्थितीशी तोंड द्यायचं आणि पुढे चालत राहायचं. हा मार्ग स्वीकारूनच तो आता यशाची पाऊलं पुढं टाकतो आहे.