झालं बरं का लग्न… अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील छोट्या सिंबाची धमालमस्ती तर दिप्या मामाला मिळाली मामी
अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. काल १ मे पासून या मालिकेने ७ वर्षांचा लिप घेतलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या सात वर्षात मालिकेमध्ये खूप मोठा बदल घडून आलेला आहे. अर्जुन आणि अप्पी दोघेही दुरावले असले तरी मुलगा अमोल म्हणजेच सिंबामुळे अजूनही ते एकमेकांच्या जवळ आहेत. छोटा सिंबा मात्र पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. खरं तर मालिका लिप घेणार हे मालिकेच्या कलाकारांना कळवण्यात आले होते पण आता या एवढ्या वर्षात अमोल सुद्धा मोठा होणार हे कळताच ही भूमिका कोण करणार? असा प्रश्नच कलाकारांना सतावत होता.
मालिकेचा नवीन प्रोमो शूट होणार त्या दिवशी या छोट्या कलाकारांची सेटवर एन्ट्री झाली आणि सगळ्यांनाच या चिमुकल्याने आश्चर्यचकित करून टाकले. कारण एवढे दिवस आपण मालिकेचे मुख्य नायक नायिका होतो पण आता हा साइराज केंद्रे भाव खाऊन जाणार हे सगळ्यांना कळून चुकले होते. आणि त्याप्रमाणे घडले देखील कारण प्रोमोनंतर सगळीकडे छोट्या साइराजचीच चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान सिंबा सोबत या मालिकेत आणखी एका पात्राची एन्ट्री झाली आहे. अप्पीचा भाऊ दिप्याचे देखील या सात वर्षात लग्न झाले आहे. दिप्याला त्याची मोना भेटली असून मालिकेत अधिकच रंगत आली आहे. ही मोना मामीची भूमिका अभिनेत्री ज्योत्स्ना संजय पाटील हिने साकारली आहे.
ज्योत्स्ना पाटील हिने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंग केले होते. साड्यांच्या जाहिरातीसाठी तिने मॉडेलिंग देखील केलं आहे. दडपण या प्रोजेक्ट मध्ये ती एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. सर्जा हा म्युजिक व्हिडीओ साठी ज्योत्स्नाने प्रमुख भूमिका साकारली होती. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मोनाच्या भूमिकेसाठी तिने ऑडिशन दिले. अनेक मुलींमधून तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मोना हे पात्र अतरंगी आहे दिप्या जसा अतरंगी होता तो गुण आता तीने हरलेला पाहायला मिळत आहे. दिप्या लग्न झाल्यानंतर एका जबाबदार व्यक्ती सारखा वागत आहे. आपल्या दिदीचा संसार सुरळीत व्हावा अशी त्याची मनापासून इच्छा आहे. पण आता मोनाच्या एंट्रीमुळे हलकी फुलकी कॉमेडी करण्याची जबाबदारी तिने स्वीकारली आहे. तेव्हा हे अतरंगी पात्र पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असणार आहेत.