मी मंगळसूत्र घालावे की नाही आडनाव लावावे की नाही हे तू ….क्षिती जोगच्या वक्तव्यावर अभिनेत्रीची खरमरीत प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निर्माती क्षिती जोग हिने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्यात तिने मंगळसुत्र न घालण्याचे तिचे मत स्पष्ट केले होते. ‘माझं लग्न झालंय हे दाखवण्यासाठी मी मंगळसूत्र का घालू?…त्याला तुम्ही असं विचारता का की तुझं लग्न झालंय मग तू त्या मुलीकडे का बघतो?…मंगळसूत्र मला घालायला आवडतं ती एक प्रीटी ज्वेलरी आहे पण म्हणून मी ते सतत घालावं ही अपेक्षा चुकीची आहे’ असे क्षितीने या मुलाखतीत म्हटले होते. सोबतच तिने नवऱ्याचे आडनाव लावत नसल्याचाही एक किस्सा सांगितला. शासकीय नोंद करणारी एक व्यक्ती क्षितिच्या घरी आली तेव्हा क्षितीने तिचं नाव क्षिती जोग असं सांगितलं तर नवऱ्याचे नाव तिने हेमंत ढोमे असं सांगितलं तेव्हा नोंदणी करणारी व्यक्ती वेगवेगळे आडनाव पाहून संभ्रमात पडली होती. पण क्षिती जोग ही लग्नानंतरही तिचे आडनाव बदलणार नाही यावर ती ठाम असलेली पाहायला मिळाली. तिच्या या दोन्ही गोष्टी नेटकऱ्यांना आवडल्या तर काहींनी मात्र तिला चांगलेच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं.
क्षितिच्या याच मुद्द्याला अनुसरून आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका देशपांडे हिने खरमरीत पोस्ट लिहिली आहे. मंगळसूत्र हा एक असा दागिना आहे ज्याचं मोल तुम्ही पैशात मोजू नाही शकत याच मुद्द्यावर राधिका तिचं मत व्यक्त करताना म्हणते की, “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? धमकी वजा सूचना समजा. उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो.
पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला. हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं.” – रानी