स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्या सध्या मराठी क्षेत्रात टॉपच्या वाहिन्या ठरल्या आहेत. पण त्यांना तगडी टक्कर देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी देखील आता पुढे सरसावली आहे. काहीच महिन्यांपूर्वी केदार शिंदे यांची कलर्स मराठी वाहिनीचे हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून कलर्स मराठीच्या मालिकेत वेगवेगळे बदल घडून येत आहेत. सुख कळले, इंद्रायणी, हसताय ना हसायलाच पाहिजे अशा धाटणीच्या मालिका आणि शोने कलर्स मराठीवर एन्ट्री केली आहे. त्यामुळे जुन्या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागत आहे. येत्या २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकताच या मालिकेचा प्रेस कॉन्फरन्स सोहळा पार पडला त्यावेळी मालिकेचे कलाकार स्पृहा जोशी, सागर देशमुख, सुनील गोडबोले, स्वप्नील परांजपे आणि निर्माता आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर मंचावर उपस्थित होते. या मालिकेच्या एंट्रीमुळे कलर्स मराठीवरील एका मालिकेला निरोप द्यावा लागला आहे. रात्री ९ वाजता प्रसारित होत असलेली ‘रमा राघव’ ही मालिका आता ९.३० वाजता प्रक्षेपित होत आहे. तर ९.३० वाजता दाखवली जाणारी ‘ भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांचा आता निरोप घेत आहे. काल या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पार पडले त्यानंतर व्रँपअप पार्टी आयोजित करण्यात आली. सेटवर केक कापून कलाकारांनी तसेच बॅक आर्टिस्टने एकमेकांसोबत फोटो काढून ही शेवटची आठवण जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ एप्रिल २०२२ मध्ये भाग्य दिले तू मला या मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता.
त्यानंतर आता जवळपास दोन वर्षाने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचे नायक नायिका राज आणि कावेरी या दोघांनी अनेक संकटं पार केली त्यांना रत्नमालाची वेळोवेळी साथ मिळत गेली. सुरुवातीला भाग्य दिले तू मला या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यावेळी टॉप १५ च्या यादीत ही मालिका गोवली गेली होती. पण कालांतराने मालिकेत येणारं ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. पण राज आणि कावेरी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे मालिका निरोप घेते हे कळताच चाहत्यांनी नाराजीचा सूर दर्शवला आहे. तर योग्य वेळी मालिका संपवल्याबद्दल काही प्रेक्षकांनी वाहिनीचे आभार देखील मानले आहेत.