तिने लक्ष्याची अभिनेत्री म्हणून प्रवेश केला…९० च्या दशकानंतर ही नायिका मराठी इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच
काही नायिका या एक दोन चित्रपट करूनही प्रसिद्धी मिळवताना दिसतात. काही मोजके चित्रपट केल्यानंतर कालांतराने या नायिका अभिनय क्षेत्रातून बाजूला होतात. पण जर हेच कलाकार तुमच्या सुपरस्टार सोबत झळकले असतील तर ते आता काय करतात किंवा कुठे असतात याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्ये असते. ९० च्या दशकात आधीच एक नायिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही मोजक्या चित्रपटातून तिने दमदार भूमिका देखील साकारल्या. अगदी लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका बनण्याचा मानही तिने मिळवला. पण काहीच वर्षात ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच. आज अशाच एका विस्मृतीत गेलेल्या नायिकेची ओळख करून घेऊ.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला. जिथे लावणीप्रधान चित्रपटांना फाटा देत या कलाकारांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे, निवेदिता सराफ या अभिनेत्रींनी त्यांना चांगली साथही दिली. अशाच एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक मॉडर्न नायिका झळकली. ही नायिका प्रत्येक चित्रपटात तिची ओळख फक्त ‘तेजश्री’ या नावानेच देऊ लागली. १९८६ साली कमलाकर तोरणे निर्मित आणि दिग्दर्शित ‘आम्ही दोघं राजा राणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होती तेजश्री. त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘मी प्रेम नगरचा राजा…’ हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांना चांगलंच स्मरणात राहीलं असेल.
घारे डोळे, मॉडर्न कपडे यामुळे ही नायिका त्यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसली. या चित्रपटानंतर तेजश्रीने “शुभ बोल नाऱ्या” या आणखी एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत सहाय्यक म्हणून काम केले. “फेका फेकी” आणि “मज्जाच मज्जा” या २ चित्रपटातून तिने विरोधी भूमिकाही साकारली. पण कालांतराने ९० च्या दशकानंतर ही नायिका मराठी इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच. अशा विस्मृतीत गेलेल्या नायिका आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहिल्यावर त्या कुठे असतील? याची केवळ चर्चा होत असते.