त्यानंतर मी च्यायला मायला बोलायला लागले….२ ते ३ वेळा इतका वाईट अनुभव आला मग ठरवलं आपण त्या वाटेल जायचंच नाही
मराठी इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्यासाठी कलाकारांना मोठा स्ट्रगल करावा लागला आहे. हा स्ट्रगल अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिलाही चुकला नाही. बालपण अतिशय सुख समृद्धीत गेलेल्या सुप्रिया पाठारे यांनी आजोबांच्या निधनानंतर मात्र हालाखीची परिस्थिती जाणून लोकांच्या घरची धुणीभांडी केली होती. सुप्रिया पाठारे यांच्या आजोबांचा तवा बनवण्याचा कारखाना होता. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय श्रीमंतीत गेले होते. पैसे ठेवायला ते डबे वापरायचे. घरात एवढी श्रीमंती असताना आजोबांचे निधन झाले त्याचदरम्यान वडिलांना दारूचे व्यसन जडले. याचमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बदलली. अगदी रोजच्या जेवणाला काय खायचं असा प्रश्न त्यांच्या आईपुढे पडला होता.
चार मुलांना दोन शिळे पाव अर्धे करून त्या खाऊ घालत होत्या. शेवटी घरची परिस्थिती पाहून आईला मदत म्हणून सुप्रिया यांनी लोकांची धुणीभांडी करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री अर्चना नेवरेकर या सुप्रिया पाठारे यांची आत्ये बहीण. जेव्हा अर्चना नेवरेकर यांनी मराठी इंडस्ट्रीत जम बसवला तेव्हा सोबत म्हणून सुप्रिया पाठारे तिच्यासोबत सेटवर जायच्या. यातूनच एक दिवास सुप्रियाला अभिनयाची संधी मिळाली. त्यावेळी कामं मिळवण्यासाठी कॉम्प्रमाईज करावं लागतं असं बोललं जायचं. पण आपण असं काहीच करणार नाही हे सुप्रिया यांनी ठरवून ठेवलं होतं. मुलगी म्हटल्यावर तुम्हाला विचारणा होणारच ना? असे त्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगतात. व्यावसायिक नाटकातून काम करत असताना दोन तीन वेळा त्यांनी असा अनुभव घेतला होता.
पण मग आपण त्या वाट्याला जायचं नाही असं त्यांनी ठरवून ठेवलं होतं. परिणामी बोलण्यातही त्यांच्या फरक पडला कारण त्यानंतर च्यायला मायला असे शब्द त्यांच्या बोलण्यातून सर्रास येऊ लागले. यामुळे समोरचे सगळे त्यांना दबकून असायचे. आपल्याला जर त्या गोष्टीकडे जायचे नाही तर आपण हे शब्द वापरायलाच हवेत याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही. लोकांनी आपल्याला गृहीत धरण्यापेक्षा त्यांनी आपल्याला घाबरलेलं चांगलं. त्यानंतर लोकं बोलायला घाबरू लागली त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्याकडे पुढे कधीच आल्या नाहीत असे त्या म्हणतात.