तो धक्का मला मुळीच सहन झाला नाही … नवऱ्याचं ऑपरेशन झालं पैश्याची गरज होती अश्यातच आई कुठे काय करते अभिनेत्रीला
मालिकेतून तडकाफडकी काढून टाकणे किंवा त्या जागी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट करणे या गोष्टी आता मराठी सृष्टीतील कलाकारांना नवीन नाहीत. ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनीही हा अनुभव घेतलेला आहे. पण नुकतीच आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री अक्षया गुरव हिनेही एक धक्कादायक अनुभव शेअर केलेला पाहायला मिळत आहे. अक्षया गुरव हिने डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी भूषण वाणी सोबत लग्न केले. दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांच्यात प्रेम जुळून आले होते. पण मधला एक कठीण काळ तिला फेस करावा लागला होता. आई कुठे काय करते या मालिकेत अक्षयाने मायाचे पात्र साकारले होते. ही भूमिका छोटीशी होती पण स्टार प्रवाह वाहिनीने संधी दिल्याने तिला प्रेक्षकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या.
अक्षयाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वाहिनीचे आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचे आभार मानले आहेत. सोबतच कठीण काळातला अनुभव सांगताना ती म्हणते की, “मी आणि भूषण आम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. मी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर कधी सहाय्यक भूमिका देखील साकारल्या आहेत. पण मधला एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्याचदरम्यान भूषणच्या पायाचे खूप मोठे ऑपरेशन झाले होते. तो पूर्णपणे बेडवर होता. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. मी काम मिळवण्यासाठी प्रत्येकाकडे विनवणी करत होते. अगदी बहीण, वहिनी, व्हिलन अशा कुठल्याही भूमिका चालतील पण मला काम द्या असे मी सगळ्यांना म्हणत होते. पाच सहा महिने भूषणला हालता येत नव्हते. त्यादरम्यान एका मोठ्या चॅनलच्या मलिकेसाठी मला ऑडिशन देण्याची संधी मिळाली. ती मालिका आता संपत आलीये. त्या मालिकेची लूक टेस्ट मी दिली होती. माझं सिलेक्शन सुद्धा झालं होतं. पण त्याच्या आदल्या दिवशी मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं असं कळवण्यात आलं. माझ्याजागी अचानक दुसऱ्या एका अभिनेत्रीला ही संधी देण्यात आली होती. हा धक्का मला मुळीच सहन झाला नाही. मालिकेतून काढून टाकलं, घरखर्च कसा भागवू, त्यावेळी काम मिळत नाही म्हणून मी खूप खचले होते.
मी कोणासमोर रडू शकत नव्हते. पण भूषणला हे जाणवलं आणि जे होतं ते चांगलं होतं तुला दुसरीकडे काम मिळेल अशी त्याने समजूत घातली. मी ज्या मलिकेसाठी ऑडिशन दिली होती ती मालिका आता वर्षभरातच बंद होतीये. मला त्या अभिनेत्रीबद्दल काहीच वाईट म्हणायचं नाही. तिने तिच्या टॅलेंटवर ही मालिका मिळवली होती. मीच जर ऐनवेळेस मालिकेतून काढता पाय घेतला असता तर चॅनलने माझ्या विरोधात वाईट साईट गोष्टी पसरवल्या असत्या. त्या मलिकेसाठी मी एक मोठी वेबसिरीज सोडून दिली होती. त्यात माझं खूप मोठं नुकसान झालं होतं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज स्टार प्रवाह वाहिनीने मला ही एक संधी मिळवून दिली. मायाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ” असे म्हणत अक्षयाने तिच्या कठीण काळातला अनुभव इथे शेअर केला.