निळू फुले यांनी मराठी सृष्टीतील एक मानाचं स्थान निर्माण केलं आहे. एक अभिनेता म्हणून त्यांनी ओळख जरी बनवली असली तरी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकदा हयातीत असताना मदतीचे हात पुढे केले होते. त्यांचा हाच जीवनप्रवास दाखवून देण्यासाठी मुलगी गार्गी फुले यांनी त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची तयारी गेल्याच वर्षी सुरू करण्यात आली होती. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. पण तूर्तास निळू फुले यांच्या जावयाची आता छोट्या पडद्यावर सुद्धा एन्ट्री झाली आहे. निळू फुले यांचा जावई म्हणजेच ओंकार थत्ते हे कलर्स मराठीच्या ‘इंद्रायणी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. याच मालिकेत निळू फुले यांची लेक गार्गी फुले सुद्धा एका छोट्याशा भूमिकेत झळकत आहेत.
त्यामुळे त्यांचा जावई आणि लेक प्रथमच छोट्या पडद्यावर एकत्रितपणे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. इंद्रायणी ही मालिकेची चिमुरडी नायिका तिच्या अतरंगी प्रश्नामुळे ओळखली जाते. आता गावात आलेला हा वाद्य वाजवणारा व्यक्ती कोण आहे याची ती आणि तिची मित्र मंडळी चौकशीला लागले आहेत. थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य याच्या ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. निळू फुले यांचा जावई म्हणून त्यांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली होती. चित्रपट करण्याअगोदर त्यांनी एक जाहिरात केली होती. त्यामुळे ओंकार थत्ते आता तिन्ही माध्यमातून झळकलेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आऊन इंद्रायणीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला आहे. पण इंद्रायणीचा सतत होत असलेला छळ पाहून प्रेक्षकांनी मालिकेवर नाराजी दर्शवली आहे. मालिका सुंदर आहे, कलाकार देखील उत्तम आहेत पण इंद्रायणीचा छळ न दाखवता तिचा हुशारीपणा अधोरेखित केला जावा अशीच प्रेक्षकांनी मागणी केली आहे. दरम्यान केदार शिंदे वाहिनीचे हेड असल्यामुळे ते या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतील असा विश्वास आहे.