लक्षाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं त्याला अखेरपर्यंत ती खंत वाटत राहिली….वर्षा उसगावकर यांचा मोठा खुलासा
मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर यांनी गाजवलेला होता. या दोघांनी एकत्रित अनेक चित्रपटातून काम केले होते. हमाल दे धमाल, कुठे कुठे शोधू मी तुला, नवरा मुंबईचा, अफलातून या आणि अशा कितीतरी चित्रपटातून या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळाली होती. बहुतेकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाट्याला विनोदी भूमिका आल्याने त्यांना आपली ही ओळख बदलवायची होती. सारख्या सारख्या त्याच त्याच भूमिकांनी त्यांची पाठ धरली होती. पण १९९२ सालच्या एक होता विदूषक या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाचे वेगळे गुण प्रेक्षकांना पाहायला मिळाले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ही मुख्य भूमिका देऊ केली होती. तेव्हा या चित्रपटात आपली सहनायीका वर्षा उसगावकर असावी अशी लक्ष्मीकांत बेर्डे यांची इच्छा होती. वर्षा उसगावकर यांनी या चित्रपटाबाबत एक खुलासा केला आहे.
त्या म्हणतात की, आज लक्ष्या असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता, त्याचं अकाली निधन झालं. मी त्याच्यासोबत एक होता विदूषक हा चित्रपट केला. त्या काळात लक्ष्या हा सारखा सारखा कॉमेडी अभिनयासाठी ओळखला जायचा. त्याला एक खंत होती आपल्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर यावेत. जब्बार पटेल यांनी त्याला ही संधी देऊ केली तेव्हा त्याने मला फोन केला. आणि या चित्रपटात माझ्यासोबत तू काम करावंस अशी इच्छा त्याने व्यक्त केली. भले तुला मानधन कमी मिळाले तरी त्यात तू मला हवी आहेस. त्याचं म्हणणं मी ऐकलं आणि चित्रपट केला. लक्ष्याने त्या चित्रपटात ज्या पद्धतीने काम केलं ते खूप टचिंग होतं. या चित्रपटात त्याचे सिन नसले तरी तो इतरांच्या सिनवेळी उपस्थित असायचा. मला त्यात एक वेगळा लक्षा पाहायला मिळाला.
त्या चित्रपटातील त्याचा अभिनय अवॉर्ड विनिंग होता त्या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता असं मला वाटलं होतं. पण त्यावर्षीचा अवॉर्ड त्याला मिळाला नाही. त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं. त्या चित्रपटासाठी आपल्याला पुरस्कार मिळायला हवा होता ही खंत त्याच्या मनात अखेरपर्यंत राहिली होती. त्याला जर तो पुरस्कार मिळाला असता तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. विनोदी अभिनयाच्या चौकटीतून त्याला बाहेर पडता आले असते.”