त्यावेळी सुनीता मिठीबाई कॉलेजमध्ये मॉडेलिंग… असा थाटला आशुतोष गोवारीकरने काजोलच्या बहिणीसोबत संसार
आज १५ फेब्रुवारी रोजी मराठी बॉलीवुड चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आशुतोष गोवारीकर हा एक प्रयोगशील आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लगान, स्वदेस, पानिपत, जोधा अकबर, मोहेंजो दाडो अशा हटके चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकण्या अगोदर आशुतोषने टीव्ही माध्यमातून अभिनेता म्हणून काम केले होते. मूळचा कोल्हापूरचा असलेला आशुतोष त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होता. मिठीबाई कॉलेजमध्ये असताना त्याने भरपूर ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. याच कॉलेजमध्ये त्याची ओळख सुनिता मुखर्जी हिच्यासोबत झाली.
सुनीता ही प्रसिद्ध फिल्ममेकर अयान मुखर्जी ह्याची सख्खी बहीण आहे तर काजोलची ती चुलत बहीण आहे. सुनीताने मिठीबाई कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग केले होते. यातूनच तिला मोठमोठ्या ब्रँड साठी काम करता आले. कॉलेजमध्ये असतानाच आशुतोष आणि सुनीता यांचे प्रेमाचे सूर जुळले होते. दोघांचेही क्षेत्र एकच असल्याने त्यांच्यात अधिक जवळीक वाढत गेली. कॉलेजमध्ये असताना आशुतोषने खूप मोठे केस वाढवलेले त्याच्या कुरळ्या आणि मोठ्या केसांमुळे तो ग्रुपमध्ये सगळ्यात वेगळा मुलगा दिसायचा. आशुतोष हा त्यादरम्यान सर्कस, इंद्रधनुष्य, कच्ची धूप या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये झळकला होता. उर्मिला मातोंडकर, करणं जोहर, शाहरुख खान अशा नवोदित कलाकारांसोबत त्यालाही मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळत गेली. चमत्कार या चित्रपटात विरोधी भूमिका साकारली होती. दरम्यान सुनीता आणि आशुतोषणे लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कोणार्क आणि विश्वांग ही त्यांची दोन मुलं. लग्नानंतर सुनीताने मॉडेलिंग क्षेत्रातून काढता पाय घेतला. मुलांचे पालनपोषण यातच तिचा वेळ जाऊ लागला. त्यानंतर तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. आशुतोष गोवारीकर या निर्मिती संस्थेतून पानिपत, स्वदेस, जोधा अकबर असे चित्रपट तिने निर्माती म्हणून केले. आशुतोष एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून बॉलिवूड सृष्टीत गणला जाऊ लागला. सुनीतामुळे मुखर्जी कुटुंबासोबत गोवारीकर कुटुंबाचे छान संबंध जुळले.