जाऊ बाई गावात या झी मराठीवरील शो चा आज रविवारी ११ फेब्रुवारी रोजी महा अंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्यात आदेश बांदेकर, महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यासह कुशल बद्रिके, शिवा मालिकेचे कलाकार आणि पारू मालिकेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. साताऱ्यातील बावधन या गावात शो चे शूटिंग पार पडले. ४ डिसेंबर रोजी सुरू झालेला हा प्रवास आज अखेर संपलेला पाहायला मिळाला. अमेक कठीण मोहिमा पार करत आज बावधनची लेक बनण्याचा मान रमशा फारुकी हिने मिळवलेला पाहायला मिळाला. रमशा ही जाऊ बाई गावात या शोच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. रमशाला बावधनची लाडकी लेक बनण्याचा मान तर मिळालाच याशिवाय तिला बक्षीस स्वरूपात २० लाख रुपयांचा धनादेश आणि वीजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. अंकिता आणि रमशा या दोघींमध्ये महाअंतिम फेरीत चुरशीची लढत रंगली.
पण शांत आणि संयमीत रमशाने तिच्या सहज वावरामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्याचमुळे रमशा विजेती ठरणार हे अगोदरच बोलले जात होते. अंकिता मेस्त्री, श्रेजा म्हात्रे,संस्कृती साळुंके, रसिका ढोबळे, रमशा फारुकी हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर श्रेजा आणि रसिकाला टॉप तीन मधून बाद व्हावे लागले. संस्कृती, रमशा आणि अंकिता हे तीन फायनलिस्ट ठरल्यानंतर विजेती कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. द्वितीय उपविजेती संस्कृती साळुंखे ठरली. तिचा तीन महिन्याचा प्रवास इथेच थांबला. गेल्या तीन महिन्यांपासून जाऊ बाई गावात या शोने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. हा शो बिग बॉस सारखा असेल अशी सुरुवातीला टीका करण्यात आली होती. पण गावच्या मातीत स्पर्धकांना वेगवेगळ्या मोहिमा पार पाडताना पाहून प्रेक्षक खुश झाले.
मुक्ता करंदीकर, मोनिशा आजगावकर, वैष्णवी सावंत, शमा लखानी, तनया अफजलपूरकर, वर्षा हेगडे, हेतल पाखरे, स्नेहा भोसले, अंकिता मेस्त्री, श्रेजा म्हात्रे,संस्कृती साळुंके, रसिका ढोबळे, रमशा फारुकी या शहरातल्या मुलींनी बावधन गावात प्रवेश केला. सुरुवातीला गावकऱ्यांसोबत त्यांना राहावे लागले त्यानंतर त्यांना हक्काचे घर मिळाले. अनेक चढ उतार सहन करत या मुलींनी मोहिमा पार पडल्या. कोंबड्या पकडण्यापासून ते दाढी करून देण्यापर्यंत सगळे टास्क त्यांनी पार पाडले. कुठेही अश्लीलपणा, किंवा बडेजावपणा न मिरवता या मुली गावच्या लोकांमध्ये छान रमल्या. हा शो संपल्यानंतरही या लोकांसाठी काहितरी करण्याची इच्छा या स्पर्धकांनी व्यक्त केली त्याचवेळी प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकली. आज त्यांचा हा प्रवास इथेच संपलेला असला तरी इथल्या लोकांसोबत त्यांचे भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षक दुसऱ्या पर्वाचीही आतापासूनच आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान रमशा फारुकी या पहिल्या पर्वाची विजेती ठरल्याने तिचे कौतुक करण्यात येत आहे.