शुक्रवारी ५ जानेवारी रोजी ‘ १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा’ शुभारंभ पार पडला. यावेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रण देण्यात आले होते. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. तर आज ७ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, नवी सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मराठी सृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सविता मालपेकर, प्रशांत दामले, गौरव मोरे, स्वप्नील राजशेखर, अर्चना नेवरेकर, प्रिया बेर्डे यांनीही नाट्यसंमेलनाला उपस्थिती लावली.
यावेळी राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. संमेलनात राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे मराठी कलाकारांवरच बरसलेले पाहायला मिळाले. नाटकांसाठी सेन्सॉर असावे का ? या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. ‘कारण नाटकात आक्षेप घ्यावा अशा गोष्टी घडत नाहीत, उलट ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही सुरू आहे ते सेन्सॉरशिवाय चालत आहे. पहिले तुम्ही मोबाईलवर बंदी आणायला हवी, कारण त्यावर आता कुणाचेही निर्बंध नाहीत. यतीन फक्त लोकसंख्या वाढू शकते एवढंच काय ते होऊ शकतं’. मराठी चित्रपटांसाठी काहीतरी करायला हवं यावर तुमचं मत काय? हा प्रश्न त्यांना विचारताच राज ठाकरे मराठी कलाकारांवरच बरसलेले पाहायला मिळाले. ते म्हणतात की “मराठी चित्रपट जर दोन कोटींमध्ये बनत असतील तर त्यात तेवढंच दाखवलं जाईल. पहिल्यांदा तुमचं बजेट वाढवायला हवं तेव्हा चांगले चित्रपट बनतील. त्याअगोदर कलाकारांनी त्यांचा आत्मसन्मान जपायला हवा. तीकडे रजनीकांत यांना इतर कलाकार मंडळी भेटल्यानंतर रजनी सर अशी हाक मारतात, कमल हसन यांना कमल सर म्हणतात. ते एकमेकांसोबत जेव्हा असतील तेव्हा ते एकमेकांना आदर देतात समाजासमोरही ते तसेच वागतात.
पण आपल्याकडे एकमेकांना आदरच दिला जात नाही. ए अंड्या, ए पांड्या अशा नावाने हाक मारतात. सर्वात अगोदर तुम्ही एकमेकांना आदराने वागवा तेव्हा तुम्हाला आदर मिळेल. ” या वाक्यावर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी देखील असाच काहीसा मुद्दा उपस्थित केला होता, की आपल्या मराठी इंडस्ट्रीत स्टार बनायला हवेत. सारासार विचार केला तर बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड सृष्टीला स्टार आहेत त्यामुळे ते प्रेक्षक आपल्या स्टारचा चित्रपट पाहायला गर्दी करतात. मराठी सृष्टीत एक दादा कोंडके यांना सोडलं तर फारसे तसे स्टार बनलेले दिसले नाहीत. आपल्या स्टारचा चित्रपट म्हणून मराठी सृष्टीत तसा स्टार बनायला हवा तरच मराठी चित्रपटांना पाहायला लोक गर्दी करतील असं एकंदरीत मत राज ठाकरे आणि नागराज मंजुळे यांच्या बोलण्यातून व्यक्त झालेलं पाहायला मिळत आहे.