झी मराठीच्या नव्या मालिकेत सहभागी होणाऱ्या दोन स्पर्धकांची नावं झाली जाहीर…एक लेडी डॉन तर दुसरी
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन रिऍलिटी शो दाखल होत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात येणार आहे. अर्थात शहरी वातावरणात वाढलेल्या आणि ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या या तरुणींना हे एक मोठे आव्हानच असणार आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी नवीन काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येतेय हे पाहून प्रेक्षक या शोकडे उत्सुकतेने पाहत आहेत. महत्वाचं म्हणजे या रिऍलिटी शोमध्ये हार्दिक जोशी सूत्रसंचालक म्हणून झळकणार का? असाही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण या नवीन रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये हार्दिक जोशीला पाहण्यात आले होते.
तेव्हा हा रिऍलिटी शो नेमका आहे तरी काय हे तुम्हाला २७ नोव्हेंबरलाच उलगडणार आहे. येत्या २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता “जाऊ बाई गावात” हा नवीन रिऍलिटी शो प्रसारित होत आहे. या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत असलेले दोन स्पर्धक प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. शहरात वाढलेली संस्कृती साळुंके आणि स्नेहा भोसले या दोन स्पर्धकांची ओळख नव्या प्रोमोमध्ये करून देण्यात आली. संस्कृतीने क्लिनिकल सायकॉलॉजी विषयातून पदवी मिळवली आहे. सांस्कृतिला खूप महागड्या वस्तू खरेदी करण्याची भारी हौस आहे. तिला फक्त पैसे लागतात असे तिचे आईवडील सांगतात. तर या शोमध्ये सहभागी होत असलेली दुसरी स्पर्धक आहे स्नेहा भोसले. स्नेहा भोसलेला किक बॉक्सिंग आवडतं. घरात तिला सगळेजण घाबरतात म्हणून तिला लेडी डॉन असेही म्हटले जाते. स्नेहाला जे करायचं असतं ते ती करतेच यावर ती कोणाचं काहीही ऐकत नाही हे ती बिनधास्तपणे सांगते.
श्रीमंतीत वाढलेली स्नेहा आणि संस्कृती गावरान आयुष्य जगणार का? जाऊ बाई गावात या शोमध्ये त्यांच्यासाठी हेच एक मोठे चॅलेंज असणार आहे. जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो बिग बॉसच्या शो शी मिळता जुळता आहे असे म्हटले जात आहे. २४तास कॅमेऱ्यासमोर राहून तुम्ही कसे आहात हे प्रेक्षकांना दाखवले जाणार आहे. यात स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. हे टास्क ते करणार की वैतागून शो सोडून देणार हे येत्या काही दिवसातच समजेल. पण तूर्तास तरी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या शोमुळे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. तर रात्री ८.३० वाजता प्रसारित होत असलेली नवा गडी नवं राज्य ही मालिका आता १०.०० वाजता दाखवली जाणार आहे.