कोणीतरी गेलं म्हणजे तो दुखावूनच जातो असं…. हास्यजत्रा सोडणाऱ्या कलाकारांबद्दल सचिन गोस्वामी यांचा मोठा खुलासा
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधुन अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले बरेचसे कलाकार कालांतराने हास्यजत्रा सोडताना पाहायला मिळाले. विशाखा सुभेदार असू दे किंवा ओंकार भोजने यांना हास्यजत्रामध्ये परत पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. त्यांना या शोमध्ये परत आणा अशी वारंवार मागणी केली जाते. खरं तर सचिन गोस्वामी आणि ओंकार भोजने यांच्यात वाद झाले म्हणूनच ओंकारने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन गोस्वामी यांनी याचे कारण उलगडले आहे. भार्गवी चिरमुले हिच्या पॉडकास्टला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी एक मुलाखत दिली आहे.
त्यात कलाकारांच्या हास्यजत्रा सोडून जाण्याबद्दल सचिन गोस्वामी यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, विशाखा सुभेदार आणि ओंकार भोजने यांच्यात छान अंडरस्टँडिंग आहे. अजूनही ओंकारचे आमच्याशी रेग्युलर बोलणे होत असते, मेसेजेस होत असतात , भेटलो की बोलतो. एकूण राजकीय वातावरणामुळे असं झालंय की कोणीतरी गेलं म्हणजे तो दुखावूनच जातो असं नसतं. हास्यजत्रा इतकी पॉप्युलर आहे की साहजिकच ती सिनेमाच्या कास्टिंग डिरेक्टरपर्यंत पोहोचते. यातूनच कलाकारांना सिनेमात काम करण्याची संधी मिळते. सुरुवातीला हास्यजत्रा आठवड्यातून चार दिवस चालत होती तेव्हा महिन्यातले साधारण २० दिवस आम्ही त्यात अडकलेले असायचो. अशावेळी कलाकार द्विधा मनस्थितीत असतात की हास्यजत्रा मंचाने आपल्याला मोठं केलंय , त्यामुळे या मंचाला सोडायचं की नवीन मोठी संधी स्वीकारायची? अशावेळी ते आमच्याशी येऊन बोलतात. ते सांगतात की पुढचे तीन महिने आम्ही येऊ शकणार नाही तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत आम्ही काय करायचं? सगळेच जर असे म्हणतील की आम्ही मोकळ्या वेळेत येऊ करायला. पण प्रेक्षकांना ते आवडणार आहे का?. हे विचारलं पाहिजे.प्रेक्षक म्हणतात की हा नाही त्यामुळे हास्यजत्रेला मजा राहिली नाही. पण सगळेजण म्हणतात की आम्हाला वेळ नाही, त्यांच्या साठी हा मंच नाही. कारण खूप जण आहेत जे या मंचावर मोठी मेहनत घेत असतात. ओंकारनेसुद्धा या गोष्टीचा खूप विचार केला होता. त्याच्याकडे तीन सिनेमे होते आणि प्रत्येकवेळी त्याला वेळ मागणं खूप ऑड वाटत होतं. या गोष्टीचा बाकीच्या जीवनावर सुद्धा परिणाम होत असतो.
तर सचिन मोटे यांनी ओंकारबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ओंकार विनम्र आणि खूपच डाऊन टू अर्थ माणूस आहे. कोविड काळात आम्ही मानधन वाढवली होती तेव्हा ओंकार स्वतः म्हणाला होता की, सर शक्य नसेल तर तुम्ही माझं नका वाढवू. कारण एवढी ओढताना चालु आहे आणि त्यालाही खूपच प्रेशर होतं की त्याच्याकडे एवढी कामं होती की तो ही कशी पार पाडणार. त्यानंतर तो फु बाई फु मध्ये गेला त्याचेही त्याने कारण सांगितलेले की तो एक छोटासा सिजन होता. हास्यजत्रा हा असा शो आहे जो मार्च टू मार्च करायचा असतो. पण ओंकारने आशिष साठी तो सिजन स्वीकारला होता. ओंकारने हास्यजत्रा सोडली अशी चर्चा त्यावेळी खूप झाली तेव्हा आशिष सुद्धा खूप ट्रोल झाला होता. आमच्यात कुठलेही वाद नाहीत तो वनिताच्या, दत्तूच्या लग्नाला आला होता समीरच्या वाढदिवसाला हजर होता. तो सतत आम्हाला भेटत असतो.त्याला जेव्हा वाटेल आमच्यासोबत काम करावं तेव्हा तो नक्की येईल. विशाखा सोबतही आमचे असेच रिलेशन आहे. तिने दहा ते बारा वर्षे सतत हेच कसं केलंय त्यामुळे वेगळं काहितरी करण्याच्या दृष्टीने विशाखाने हास्यजत्रा सोडली होती. आमच्यात कधीच काही खटके उडाले नाहीत किंवा त्यांच्या तक्रारी आहेत म्हणून कोणी बाहेर गेलंय असं काहीच नाही.