हिंदी बिग बॉसचा १७ वा सिजन सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या केवळ दोन आठवड्यातच मराठमोळ्या धाकड गर्ल अंकिता लोखंडेने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शो सुरू झाल्यापासूनच अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्याच नावाची सगळीकडे जोरदार चर्चा पहायला मिळते. बिग बॉसच्या घरातच नव्हे तर अगदी हिंदी सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या नावाचाच जप सुरू केला आहे. अंकिता आणि विकी जैन एकमेकांसोबत वाद घालवत फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप घरातील सदस्य करत आहेत. विकी सोबत तिचे अनेकदा वाद झाले आहेत. अंकिता विकीसोबत भांडल्यानंतर अनेकदा एकटी राहून रडताना पहायला मिळाली आहे. त्यामुळे अंकिता लोकांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व नाटक करतीये असा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे.
पण असे असले तरी सर्वात स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून अंकिताकडे पाहिले जाते. तसेच सिजन १७ ची सर्वात जास्त मानधन घेणारी ती सदस्य ठरली आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून अंकिताने तिच्या आणि सुशांतच्या ब्रेकअपबद्दलही खुलासा केला. गार्डन एरियात मूनव्वरसोबत बोलताना अंकिता म्हणाली की, सुशांत यशाच्या शिखरावर होता त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याचे कान भरण्यास सुरुवात केली होती. त्या एका रात्री नंतर मला त्याच्या डोळ्यात प्रेम जाणवत नव्हतं. आता सगळं संपलंय हे मला दिसून आलं. अशातच अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात कशी झाली याचाही खुलासा केला. आपल्या स्ट्रगल लाईफ बद्दल बोलताना अंकिता म्हणते की, ” वयाच्या १८ व्या वर्षी मी मुंबईत आले. कोणी दुसऱ्यांनी आपल्याला वेड्यात काढू नये म्हणून मी स्मार्ट असल्यासारखी सतत सतर्क राहत होते. मला काय करायचं होतं ते मला ठाऊक होतं. त्यामुळे मी वायफट गप्पा कधी मारल्या नाहीत.पण एक वेळ अशी आली जेव्हा माझ्याकडे खर्चायला अजिबातच पैसे शिल्लक नव्हते. मी खाऊ काय आणि ऑडिशनला कशी जाऊ हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. आईवडिलांकडेही किती दिवस मागणार होते मी पैसे?. हा स्ट्रगलचा काळ मी सुद्धा अनुभवला होता. मालिका मिळाली त्यानंतर मी खूप खुश झाले.
त्यात मला २००० रुपये पर डे मिळायचे. रोज २ हजार रुपये मिळायचे त्यातून टीडीएस कट होत होता. महिन्याला मला ५०,००० रुपये मिळायचे . मी आयुष्यात त्याअगोदर कधीच ५० हजार रुपये पाहिले नव्हते . माझ्या आईवडिलांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालं होतं. मी मालिकेत काम करते म्हणून त्यांनी लोकांची बोलणी ऐकली होती पण त्यांनी दिलेला पाठिंबाच माझ्यासाठी ताकद बनून गेली.” २००९ साली अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. तिची प्रमुख भूमिका असलेली ही पहिलीच मालिका होती. अर्चनाच्या भूमिकेने अंकिताला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्या काळात पर डे २ हजार रुपये मराठी इंडस्ट्रीच्या तुलनेत खूपच जास्त होते. आजही मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना खूप कमी मानधन मिळते अशी ओरड पाहायला मिळते. कधी कधी तर केलेल्या कामाचे पैसे देखील त्यांना मिळत नाहीत अशी खंत कित्येकदा बोलून दाखवली जाते.