
चित्रपट मालिकेतील बालकलाकार हे त्यांच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात. १९९७ सालचा ‘हसरी’ हा चित्रपट त्यातलाच एक. या चित्रपटातील बालकलाकार हसरी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका साकारणाऱ्या मानसी आमडेकर हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात. गेल्याच वर्षी हसरी चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी मानसीने ‘हसरी २६ वर्षांची झाली’ अशी एक गोड आठवण सांगणारी पोस्ट लिहिली होती. मानसीचे संपुर्ण बालपण ठाण्यातच गेले. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुल तसेच विनायक गणेश वझे कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

एक समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ अशीही तिची ओळख आहे. कॉलेजमध्ये असताना मधल्या काळात मानसीने राज्य नाट्य स्पर्धामधून सहभाग दर्शवला होता. मानसीचे आई वडील दोघेही नाटकातून काम करत असत. ‘आई परत येतीये’ या नाटकात त्यांनी मानसीला बालकलाकार म्हणून भूमिका दिली होती. याच नाटकामुळे मानसीला चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मानसीचा अभिनय पाहून मानसीच्या बाबांच्या मित्राने सुभाष फडके यांना तिचे नाव सुचवले होते. दुसरी इयत्तेत असताना मानसीला हसरी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर मानसी ‘आई थोर तुझे उपकार’ या आणखी एका चित्रपटात झळकली. पण पुढे अभिनय क्षेत्रात न येता मानसी लेखिका, निवेदिका, सुत्रसंचालिका, मुलाखतकार, रेडिओ जॉकी अशा विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सह्याद्री वाहिनीवरील ‘आपला महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे ती निवेदन करताना दिसते. आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच वृत्तपत्रात लेख लिहिण्याचेही ती काम करते. एवढेच नाही तर एफ एम गोल्ड या रेडिओ चॅनलवर ती रेडिओ जॉकी बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या ८ वर्षांपासून मानसी रेडिओ जॉकी म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ठाण्यात पार पडलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तिने सूत्रसंचालन केले आहे. त्यामुळे मानसी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी तिचा विविध क्षेत्रातला हा दांडगा अनुभव तिला मोठी प्रसिद्धी मिळवून देताना दिसत आहे. बालकलाकार म्हणून केवळ दोनच चित्रपटात झळकलेली मानसी आता विविध क्षेत्राची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहे.