आता थांबतो तुमचा निरोप घेतो पण… ९ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर चला हवा येउ द्या चा अखेर निरोप
चला हवा येऊ द्या या शोने जवळपास ९ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कपिल शर्माच्या शो प्रमाणे मराठीत कुठला शो सर्वात जास्त काळ चालला असेल तर तो आहे चला हवा येऊ द्या . या शोमध्ये चित्रपट मालिकांचे प्रमोशन केले जात होते सोबतच हिंदी सेलिब्रिटींनाही या शोची भुरळ पडली होती. मराठी प्रेक्षकांना जर चित्रपटापर्यंत खेचून आणायचे असेल तर बॉलीवुडवाले चला हवा येऊ द्या हे माध्यम प्रभावी मानत होते. त्यानंतर अलीकडेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला देखील ही संधी मिळत गेली. पण चला हवा येऊ द्या च्या मंचावर आजवर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंग, अजय देवगण, काजोल, अक्षय कुमार सारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
इतके वर्षे चला हवा येऊ द्या ने प्रेक्षकांचे तर मनोरंजन केलेच पण त्यातील कलाकारांनाही आर्थिक दृष्टीने भरभराटीला आणले. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे यांनी या शोच्या माध्यमातून मुंबईत स्वतःचे घर केले. पण आता या शोच्या निरोपाची वेळ जवळ आलेली आहे. निलेश साबळेने स्वतःच या शोच्या निरोपाची वेळ आली असल्याचे जाहीर केले आहे. या शोबद्दल निलेश साबळे म्हणतो की, ” चला हवा येऊ द्या हा शो आता थांबत आहे, पण प्रेक्षकांच्या तो कायम मनात असेल. गेल्या नऊ वर्षात या शोने जवळपास एक हजाराहून अधिक भाग केले आहेत. माझ्यासह सगळ्या टीमला या शोने नाव, ओळख मिळवून दिली आहे, आर्थिक स्थिरता दिली आहे. तूर्तास थांबण्याची वेळ आली असल्याचे वाहिनीने सांगितले आहे. पण कदाचित सहा सात महिन्यानंतर आम्ही नवे पर्व घेऊन येऊ अशी शक्यता वाटते”. असे म्हणत निलेश साबळे आता या शोच्या निरोपाची वेळ आली असल्याचे जाहीर करतो.
खरं तर चला हवा येऊ द्या या शोने केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशात देखील शो केलेले आहेत. नवनवीन कलाकारांना त्यांनी या मंचावर येण्याची संधी दिली आहे. सेलिब्रिटी पर्व, बालकलाकार ते अगदी वयोवृद्धापर्यंत असलेल्या कलाकारांनी त्यांची कला या मंचावर सादर केली आहे. कोरोनाच्या काळातही नवख्या कलाकारांचे व्हिडीओ चला हवा येऊ द्या मध्ये दाखवण्यात आले होते. या कठीण काळात चला हवा येऊ द्या ने घरी बसलेल्या तमाम प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. यात कधी कलाकारांचे कौतुकही झाले तर कधी ही कलाकार मंडळी साड्या नेसतात म्हणून टीकाही करण्यात आली. पण या गोष्टीला न जुमानता भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांनी साड्या नेसून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना तुफान हसवले. पण गेल्या काही दिवसांपासून या शोचा टीआरपी खाली आला तसा आता वाहिनीने हा शोच बंद करण्याचा निर्णय घेतला. पण चला हवा येऊ द्या हा शो झी मराठीचा श्वास आहे. आणि हा शो बंद झाला तर आता नवीन काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
त्यामुळे निलेश साबळे ने शोच्या निरोपाची बातमी जाहीर करताच संमिश्र प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत. वाहिनीचा श्वासच हरपला तर काय होईल या विचाराने प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पण पुढे कदाचित सात आठ महिन्यात पुन्हा या शोने नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशी मागणी केली आहे.